मुंबई – संपूर्ण जगभरात कोरोनाची दहशत निर्माण झाल्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लोकांना घरातच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणासाठीच लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. चीन, अमेरिका, इटली यादेशांसह भारतातही काही राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लोकांना सुरक्षित राहण्यासाठी आवाहन केलं जात आहे. जगभरात ३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबद्दल सोशल मीडियात अनेक अफवांना ऊत आला आहे. अशातच रशियामधील एक मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी लोकांना घराबाहेर पडू नये असं आवाहन केले आहे. मात्र लोक आवाहनाला प्रतिसाद देत नाही त्यामुळे त्यांनी रशियाच्या रस्त्यांवर ८०० सिंह आणि वाघ यांना मोकळं सोडलं आहे असा दावा या मॅसेजमध्ये करण्यात आला आहे.
ह्युमर टीव्ही या फेसबुकचा पेजचा फोटो कॅप्शनसह व्हायरल होत आहे. यात ८०० सिंह आणि वाघ रस्त्यावर फिरत असतानाचा फोटो आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी असं पाऊल उचललं आहे असं सांगण्यात आले आहे. आतापर्यंत १८ हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ट्विटर, फेसबुकवर ही पोस्ट व्हायरल होत आहे.
मात्र एका इंग्रजी न्यूज चॅनेलने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा खोटा असल्याचं आढळून आलं आहे. हा फोटो २०१६ मधील दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथला आहे. गुगल रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने १५ एप्रिल २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या “डेली मेल” चा एक वृत्त सापडलं. या वृत्तानुसार कोलंबस नावाच्या या सिंहाला जोहान्सबर्गमधील एका प्रोडक्शन क्रूने चित्रीकरणासाठी आणले होते. तर "न्यूयॉर्क पोस्ट" च्या दुसर्या वृत्तात असं म्हटले आहे की चित्रीकरणाला परवानगी मिळाली नव्हती. जोहान्सबर्ग रोड्स एजन्सीचा हवाला देण्यात आला आहे. चित्रीकरणाला मान्यता मिळाली नव्हती तरीही या प्रोडक्शन कंपनीने रस्ते बंद न करताही सिंहाला रस्त्यावर सोडण्याची जोखीम पत्करली होती.
व्हॉट्सअपवर या चित्रीकरणाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवर ब्रेकिंग न्यूजची ग्राफिक्स प्लेट लावण्यात आली आहे आणि सांगितलं गेलं की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून रशियाने त्यांच्या रस्त्यावर ५०० पेक्षा अधिक सिंह सोडले आहेत. मात्र फॅक्ट चेकनुसार ही ग्राफिक्स प्लेट कोणत्याही वृत्तवाहिनीशी संबंधित नाही. हा फेक फोटो वेबसाइटच्या आधारे बनवण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या सिंहाच्या फोटोचा रशिया आणि पुतीन यांच्याशी काहीही संबंध नाही. २०१६ मधील एका शुटिंगदरम्यानचा हा फोटो आहे. त्यामुळे मॅसेजमध्ये करण्यात आलेला दावा पूर्णत: खोटा आहे.