सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देश लॉकडाउन करण्यात आला आहे. अनेक लोकांनी स्वत:ला कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी घरात बंद करून घेतलंय. पण काही महाभाग असेही आहेत जे लॉकडाउनला न जुमानता बाहेर फिरायला निघत आहेत. अशांना कुठे पोलीस फटके देऊन समजावत आहे तर कुठे आणखी वेगळ्या पद्धतीने. तामिळनाडूतील एक पोलीस चक्क कोरोना व्हायरस सारखा दिसणारा हेल्मेट घालून लोकांना घरात राहण्याचं आवाहन करत आहे.
लॉकडाउनदरम्यानचे पोलिसांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यातील हा एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. लॉकडाउन नियमांच उल्लंघन करणाऱ्या लोकांना हा पोलीस चक्क कोरोना व्हायरससारखा दिसणारा हेल्मेट घालून समजावत आहे.
लोकांना घरात राहण्याचं आवाहन करण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या आयडिया करणं सुरू केलं आहे. त्यातीलच हे एक भारी उदाहरण आहे. लोकांना त्यांचं घरात राहणं किती महत्वाचं आहे हे पोलीस त्यांना पटवून देत आहेत. हा व्हिडीओ चेन्नईतील असल्याचे बोलले जात आहे.
तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा आकडा वाढू नये म्हणून लोकांना घरातच ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत.