वुहान – सध्या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येणं कठीण आहे. ज्या चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरला, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही कोरोनाचा फटका बसला. दरदिवशी वुहानमधून अनेक बातम्या समोर येत असतात. बाजार कधी उघडणार? शाळा कधी सुरु होणार? सोशल डिस्टेंसिगसाठी लोकांनी काय काय करायला हवं. त्यातच सध्या एका कारचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या कारची नंबर प्लेट पाहिली तरी ती वुहानची असल्याचं समोर आलं आहे. या कारचा फोटो चीनच्या अनेक सोशल मीडिया साईट्सवर व्हायरल होत आहे. सीजीटीएननुसार ही कार चीनच्या जियांगसू पूर्व रेल्वे स्टेशन, हेनान परिसरात उभी आहे. कारची नंबर प्लेट वुहानची आहे. संपूर्ण कार धुळीने माखली आहे. पण कारच्या काचेवर जे लिहिलं आहे ते लोकांना खूप आवडू लागलं आहे.
या कारवर काही शुभेच्छा लिहिल्या आहेत. चीनी भाषेत लिहिलं आहे की, लढा आणि सुरक्षित परत या, म्हणजे लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कारवरुन अशाप्रकारे कोरोना रुग्णांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा कारच्या प्रत्येक काचेवर लिहिण्यात आल्या आहेत. या कारचा मालक वुहानमध्ये राहतो. रेल्वे प्रशासनाने सांगितलं की, गेल्या ४ महिन्यापासून ही कार इथं उभी आहे.
तसेच कारमालकाच्या मित्राने याठिकाणाहून कार हटवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत लॉकडाऊन सुरु झाल्याने ते शक्य झालं नाही, या कारचा मालक वुहानला राहत असून तो सुरक्षित असल्याचं मित्राने सांगितले. या कारवर ज्या शुभेच्छा लिहिल्या आहेत त्या जगापर्यंत पोहचल्या पाहिजेत, सर्वजण सुरक्षित राहायला हवे असं मित्राने सांगितले.