एका बहादूर अॅमेझॉन डिलिवरी गर्लने एक ग्राहक आणि तिच्या लहान डॉगीला हल्ल्यातून वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकला. ही घटना अमेरिकेच्या लास वेगासमधील आहे. डोरबेल व्हिडीओत दिसतं की, १९ वर्षीय लॉरेन तिच्या डॉगीसोबत बाहेर उभी होती. तिथे अचानक एक खतरनाक बुलडॉग कुत्रा येतो. बुलडॉग तरूणीच्या लहान डॉगीवर अचानक हल्ला करू लागतो. कुत्रा इतका खतरनाक हल्ला करतो की, जराही थांबत नाही. अशात तरूणी तिच्या जखमी डॉगी मॅक्सला उचलून घेते. तरी सुद्धा बुलडॉग त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.
तरूणी आपल्या डॉगीला वाचवण्यासाठी आणि बुलडॉगला दूर ठेवण्यासाठी बराचवेळ लढत राहिली. पण बुलडॉग जात नसल्याचं पाहून ती मदतीसाठी आवाज देते आणि मग तेथून जात असलेली डिलिवरी गर्ल स्टेफनी लोंट्ज तिथे आली. तिने तरूणीला बुलडॉगसोबत संघर्ष करताना पाहिलं आणि मग ती बुलडॉगच्या आडवी झाली. इतक्यात तरूणी तिच्या डॉगीला घेऊन घरात गेली.
अॅमेझॉन ड्रायव्हरने तरूणी आणि तिच्या डॉगीला वाचवलं आणि तिथून निघून गेली. जाताना ती बुलडॉगला 'बॅड डॉग'असं म्हणून गेली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लोक भरभरून अॅमेझॉनच्या डिलिवरी गर्लचं कौतुक करत आहेत.
लॉरेनने नंतर सांगितलं की, 'माझ्याकडे धन्यवाद देण्यासाठी योग्य वेळ नव्हता. त्यावेळी मी आतून हादरली होती. पण मला फार आनंद आहे की, मी तुला पुन्हा भेटले आणि हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे'. अॅमेझॉनची बहादूर कर्मचारी म्हणाली की 'तिच्या ओरडण्याने मला विचार करण्यास भाग पाडलं होतं. मला केवळ इतकंच वाटतं की कुणी अशा स्थितीत असेल तर त्यांची मदत केली गेली पाहिजे. हे केवळ मानवतेचं काम आहे'.