प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. मध्यंतरी एकाने करोडोंची मर्सिडीज कार जाळली होती. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये कार जाळली नाही तर ती हवेत उडविण्यात आली आहे. ही कार जगप्रसिद्ध कंपनी टेस्लाची आहे. हा व्हिडीओ पाहून एलन मस्क यांनी देखील कपाळावर हात मारून घेतला असेल.
काही दिवसांपूर्वी टेस्लावर नाराज झालेल्या ग्राहकाने त्याची कार बॉम्ब लावून उडवून दिली होती. आता एका व्यक्तीने ही महागडी इलेक्ट्रीक कार हवेत उडविण्याचा कारनामा केला आहे. यानंतर जे झाले ते पाहून त्या व्यक्तीला जबरदस्त झटका बसला आहे.
टेस्लाच्या कार पूर्णपणे इलेक्ट्रीक आहेत. जगभरात या कंपनीच्या कारना मोठी मागणी आहे. मात्र, तरी देखील या कंपनीला शिव्या घालणारे देखील भरपूर आहेत. कंपनीचा ऑटोनॉमस मोड खूप चर्चेत आहे. तो कधी कधी काम करायचे बंद करतो तर कधी चंद्राला सिग्नल समजतो आणि ब्रेक मारत सुटतो. यामुळे कंपनीवर अनेक खटले दाखल आहेत.
आता आलेल्या व्हिडीओमध्ये कार मालक आणि त्याचे काही मित्र स्टंट करताना दिसत आहे. त्यांनी ही कार ऑटो पायलट मोडवर ठेवली आणि एका चौकातील स्पीडब्रेकवरून जंप केली. ही कार समोर जाणाऱ्या रस्त्यावर तोंडावर आदळली. पलटी झाली नाही, परंतू पुढच्या दर्शनी भागाचे एवढे नुकसान झाले की ती आता स्क्रॅपमध्येच काढावी लागण्याची शक्यता आहे. या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या अँगलने हे क्षण रेकॉर्ड करण्यात आले आहेत. यात काही जण डोक्यावर हात मारताना देखील दिसत आहेत. पहा हा खतरनाक स्टंट जो अनेक लोकांनी पाहिला आहे.