सार्वजनिक ठिकाणी धोकादायक स्टंट करण्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. सेल्फी, व्हिडीओ, फोटो आणि रिल्सच्या नादात लोक आपला जीव धोक्यात टाकतात. पुढे विपरित घटना घडू शकते याचा ते विचार करत नाहीत. एका व्यक्तीने असंच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या व्हि़डीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
एका व्यक्तीने टॉय ट्रेनच्या ट्रॅकवर उभं राहून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव धोक्यात टाकल्याची घटना समोर आली आहे. दार्जिलिंगमध्ये ही घटना घडली. इन्स्टाग्रामवर हा व्हि़डीओ शेअर करण्यात आला असून सध्या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंत ५.५ मिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. सोशल मीडियावर लक्ष वेधण्यासाठी त्या व्यक्तीने हे जाणूनबुजून केल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. तर काहींनी त्याच्या बेफिकीर वागण्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सोनू नावाचा माणूस टॉय ट्रेन ट्रॅकवर उभा होता. मागून येत असलेल्या ट्रेनचा हॉर्न वाजत असतानाही सोनू सेल्फी घेत होता आणि त्याने धोक्याकडे लक्ष दिले नाही. याच दरम्यान त्याची पत्नी घाबरून ओरडत असल्याचं ऐकायला येत आहे. अशातच ट्रॅकजवळील एका व्यक्तीने सोनूला ट्रॅकवरून बाजुला खेचलं आणि त्याचा जीव वाचवला.
एक सेकंद जरी उशीर झाला असता तर अनर्थ घडला असता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांपैकी एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवल्याने सोनूचा जीव वाचला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हि़डीओ शेअर करण्यात आला असून 'सेल्फीच्या नादात आज थोडक्यात वाचलो' असं कॅप्शन देण्यात आलं आहे. तसेच काही लोकांनी या सोनूवर कडक कारवाई करा अशी मागणीही केली आहे.