संपूर्ण जगासह भारतातही कोरोना विषाणूचं संकट उभं राहिलं आहे. या महामारीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणं हा एकमेव उपाय सध्या दिसून येतो. जानेवारीपासून देशात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. २१ जून पासून देशातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य कर्मचारी काम करत आहेत.
देशातील अनेक दुर्गम भागात पोहचून आरोग्य कर्मचारी लसीकरण करत आहेत. आजही देशात अनेक भाग असे आहेत जिथं ना बस जाते, बाईक जाते ना कोणतंही वाहन जातं. त्याठिकाणी पायपीट केल्याशिवाय पर्याय नाही. अशातच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक महिला नर्स मुलाला पाठीवर बांधून नदी पार करत आहे. ही महिला झारखंडमधील आहे. नदी ओलांडून दुर्गम भागातील लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी ही नर्स प्रयत्न करत आहे.
या महिला नर्सचं नाव मानती कुमारी असं आहे. ती चेतमाच्या उपआरोग्य केंद्रात काम करते. मानती कुमारी प्रत्येक महिन्याला अक्सी पंचायतीच्या एका गावात लहान मुलांच्या लसीकरणासाठी जाते. मुसळधार पावसामुळे एका आठवड्यापासून नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. मात्र काम थांबवू शकत नाही असं मानती म्हणते. ती तिच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पाठीवर घेऊन आसपासच्या गावात लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी जाते. Burra नदी ओलांडून ती दुर्गम गावात पोहचते.
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याचे उपायुक्त अबू इमरान म्हणाले की, हा फोटो एका धाडसी नर्सचा आहे. परंतु आम्ही तिला असं करू देणार नाही. त्यांनी या फोटोनंतर संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्या गावात ती जाते तिथे जाण्यासाठी रोड नाही. महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे समस्या येत असतील तर त्यांना तात्काळ वरिष्ठांना सांगावं जेणेकरून या समस्येवर तोडगा काढता येईल.सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी महिलेच्या धाडसाचं कौतुक केले.