Pune CA Death : आजकाल कंपन्यांमध्ये कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर इतका असतो की सुट्टीच्या दिवशीही ते कामात व्यस्त असलेले पाहायला मिळतात. मग तो सण-उत्सव असो, मुलांच्या शाळेतील काही कार्यक्रम असो, किंवा तब्येत बिघडले असो. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामातून दिलासा मिळत नाही कारण त्यांचे टार्गेट पूर्ण होत नाही. हे टार्गेट पूर्ण करताना कर्मचारी आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही आणि आरोग्य बिघडते. पुण्यातील एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या मुलीसोबत असेच घडले मुलीवर कामाचा ताण इतका होता की तिचा मृत्यू झाला. आता मुलीच्या आईने कंपनीच्या प्रमुखांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महिलेचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकरणी रोष व्यक्त केला जातोय.
पुण्यातील २६ वर्षीय तरुणीच्या मृत्यूच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या मुलीच्या आईने मुलीच्या तिच्या वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. मुलीच्या वरिष्ठांनी तिच्याकडून इतके काम करुन घेतले की ती तणावाखाली गेली होती. तिच्यावर सतत कामाचा ताण येत होता, शेवटी कामाच्या ओझ्याखाली माझी मुलगी मरण पावली, असा आरोप आईने केला. मार्च २०२४ मध्ये ही मुलगी पुण्यातील एका कंपनीत रुजू झाली होती. मात्र जुलैमध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आता तिच्या आईने लिहिलेल्या भावनिक पत्रामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.
मृत्यू झालेल्या मुलीचे नाव ॲना सबासियन आहे. ती पुण्याच्या एका कंपनीत चार्टर्ड अकाउंटंट होती. जुलै महिन्यात तिचे निधन झाले. यानंतर मुलीची आई अनिता ऑगस्टीन यांनी कंपनीचे प्रमुख यांना पत्र लिहून कंपनीतील चुकीची कार्यसंस्कृती आणि व्यवस्थापकांच्या गैरवर्तनाची तक्रार केली. आपल्या मुलीला न्याय देण्याची मागणी करत संघटनेत बदल घडवून आणण्याची मागणीही अनिता ऑगस्टीन यांनी केली.
"मी हे पत्र एक दुःखी आई म्हणून लिहित आहे जिने आपले मौल्यवान मूल गमावले आहे. १९ मार्च २०२४ रोजी ती पुणे येथे कार्यकारी म्हणून रुजू झाली. पण चार महिन्यांनंतर, २० जुलै रोजी, जेव्हा मला ॲनाचे निधन झाल्याची भयंकर बातमी मिळाली तेव्हा माझे जग उद्ध्वस्त झाले. ती फक्त २६ वर्षांची होती. कामाचा ताण, नवीन वातावरण आणि कामाचे दीर्घ तास यांचा शारीरिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या तिच्यावर परिणाम झाला. कंपनीत रुजू झाल्यानंतर लगेचच तिला चिंता, निद्रानाश आणि तणावाचा अनुभव येऊ लागला. पण कठोर परिश्रम आणि चिकाटी ही यशाची गुरुकिल्ली आहे यावर विश्वास ठेवून ती स्वतःला पुढे ढकलत राहिली. जेव्हा ॲना या कंपनीत आली तेव्हा सांगितले की कामाच्या जास्त ताणामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. टीम मॅनेजर तिला म्हणाला, ॲना, तुला आमच्या टीमबद्दल सगळ्यांचं मत बदलायला हवं. माझ्या मुलीला हे कळले नाही की यासाठी तिच्या जीवाने याची किंमत मोजेल," असे या पत्रात म्हटलं आहे.
"तिच्याकडे खूप काम होतं. तिला अनेकदा विश्रांतीसाठी थोडाच वेळ मिळत असे. तिचा मॅनेजर अनेकदा क्रिकेट सामन्यांदरम्यान मीटिंग्ज पुन्हा शेड्यूल करत असे आणि दिवसाच्या शेवटी तिला काम सोपवायचा. ज्यामुळे तिचा ताण वाढला. ती रात्री उशिरापर्यंत काम करायची, अगदी वीकेंडलाही. तिला श्वास घ्यायलाही वेळ दिला गेला नाही. तिच्या असिस्टंट मॅनेजरने एकदा तिला रात्री फोन केला की दुसऱ्या दिवशी सकाळी एक टास्क पूर्ण करायचा. ती रात्रभर काम करत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी कसलीही विश्रांती न घेता ऑफिसला गेली. धक्कादायक बाब म्हणजे ॲनाच्या अंत्यसंस्काराला कंपनीमधील कोणीही उपस्थित नव्हते. माझ्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी कोणाकडे एक मिनिटही नव्हता का?," असाही सवाल अनिता यांनी पत्रातून केला आहे.