सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. परदेशी पर्यटकांसोबत दिल्लीतील लहान मुलींनी जे वर्तन केलं ते अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं जात आहे. पैशासाठी दोन लहान मुलींनी जीव धोक्यात घालून परदेशी पर्यटकांचा पाठलाग केला आहे.
दिल्लीत दोन मुलींनी अशाप्रकारे पाठलाग केल्याने ई-रिक्षात बसलेले परदेशी पर्यटक अस्वस्थ झाले. या घटनेमुळे परदेशी पर्यटकांना असुरक्षित वाटू लागलं आहे. गुरुवारपासून (१८ जुलै) सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही गरीब मुली भारतात फिरायला आलेल्या परदेशी नागरिकांच्या ई-रिक्षाचा कसा पाठलाग करत आहेत ते पाहायला मिळतं.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक विदेशी नागरिक ई-रिक्षात बसून आपल्या मोबाईलवर व्हिडीओ बनवताना दिसत आहे. त्यात त्याच्यासोबत इतरही परदेशी नागरिक बसले आहेत, कॅमेरा मागे फिरवताच काही मुली रस्त्यावरून ई-रिक्षाचा पाठलाग करताना दिसतात. यातील एक मुलगी त्या ई-रिक्षाच्या मागच्या बाजूला लटकली आहे. हे पाहून परदेशी पर्यटक आश्चर्यचकित झाले आहेत.
ई-रिक्षा थोडी पुढे थांबताच मागे धावणारी मुलगीही ई-रिक्षाजवळ येते आणि पैशाची मागणी करू लागते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने परदेशी पर्यटकासाठी हा खूप वाईट अनुभव आहे, भारतातील सुमारे तीन लाख मुलं रस्त्यावर भीक मागतात, यातील अनेक मुलं शाळेतही जात नाहीत असं म्हटलं आहे.