एखाद्याने पहिल्याच नोकरीचा पहिल्याच दिवशी राजीनामा दिला अस जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. दिल्लीतील एका तरुणाने असं केलं आहे. तरुणाच्या या निर्णयामुळे बहुतेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दिल्लीतील एका तरुणाला गुरुग्राममध्ये पहिली नोकरी मिळाली. मात्र नोकरीत रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याने राजीनामा दिला. सोशल मीडियावर त्याने याचं कारण सांगितलं. घरापासून ऑफिस लांब असल्याने पहिल्याच दिवशी नोकरी सोडल्याचं या तरुणाचे म्हणणं आहे.
तरुणाने स्वतः सोशल मीडियावर संपूर्ण गोष्ट शेअर केली आहे. पण आता मात्र त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. कारण मोठ्या संख्येने लोक दिल्लीहून गुरुग्रामला नोकरीसाठी जातात आणि असे लोक आता या तरुणांना सल्ला देत आहेत की चांगली नोकरी, चांगला पगार यासाठी काही समस्यांना तोंड द्यावं लागेल. घरी बसून नोकरी कुठे मिळेल? हा तरुण दिल्लीच्या नॉर्थ वेस्ट भागात राहत होता.
मुलाखतीच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्यानंतर ही नोकरी मिळाल्याचं त्याने सांगितलं. मी खूप उत्साही होतो.. कारण ही माझी पहिली नोकरी होती. पण नंतर लक्षात आले की या कामासाठी रोज खूप प्रवास करावा लागतो. कारण मी दिल्लीच्या नॉर्थ वेस्ट भागात पिंकलाइनवर राहत होतो आणि नोकरी मौलसरी अव्हेन्यूमध्ये होती. तरुणांच्या म्हणण्यानुसार, या नोकरीमुळे तो घरात फक्त 3 तास राहू शकत होता. याशिवाय प्रवासासाठी पाच हजार रुपये खर्च करावे लागले. त्यानंतर त्याने राजीनामा दिला.
लोकांनी तरुणाला सांगितलं की बहुतांश चांगल्या कंपन्या फक्त गुरुग्राममध्ये आहेत. त्यामुळे तुला चांगल्या नोकरीसाठी प्रवास करावा लागेल. आपला अनुभव शेअर करताना एका युजरने लिहिले की, मी गाझियाबादहून दररोज गुरुग्रामला जातो. एका बाजूने प्रवास करण्यासाठी मला सुमारे 120-130 मिनिटे लागतात. मी अभ्यास करण्यासाठी माझ्या वरिष्ठांकडून पुस्तकं घेतो आणि मेट्रोमध्ये अभ्यास करतो. हे काम 6 वर्षांपासून सुरू आहे. प्रवासाला जास्त वेळ लागत असेल तर त्या वेळेचा सदुपयोग करायला शिका. तुमच्या मार्गावरून जाणाऱ्या सहकाऱ्यांशी मैत्री करा. वेळ छान निघून जाईल.
आणखी एका युजरने लिहिले की, दिल्लीतील निम्मे लोक रोज गुरुग्रामला जातात. अधिक कमाई करण्यासाठी, तुला धावावं लागेल. त्यानंतर या तरुणाला वाईट वाटलं. त्याने आपली पोस्ट एडीट करून मी घाईघाईने निर्णय घेतल्याचं लिहिलं. लोक रोज एवढा प्रवास करतात हे मला माहितही नव्हते. माझ्याशी बोलायला कोणीच नव्हतं म्हणून घाईघाईने हा निर्णय घेतला. पण भविष्यात मला जी काही संधी मिळेल त्यावर मी चांगले काम करेन असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.