नवी दिल्ली – सध्या दिल्लीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही मुली रात्री पार्टीहून घरी परतत होत्या तेव्हा काही टवाळखोरांनी या मुलींना त्यांचा रेट विचारला. त्यानंतर मुली संतापल्या. मुली भडकलेल्या पाहून टवाळखोरांनी तिथून पळ काढला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत दोन्ही मुलींना ही घटना सांगितली.
एका मुलीने सांगितले की, रात्री मी काही मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी हौजखास विलेज इथे गेलो. जेव्हा पार्टी संपली तेव्हा आम्ही कॅब आणि एका मित्राची वाट पाहत होतो. तेव्हा काही मुलं आमच्या दिशेने आली. ज्यातील अनेकांचे वय ४० पेक्षा जास्त असेल. ते आमच्याजवळ आले आणि विचारलं रेट काय आहे? मी हैराण झाले. रात्री १० च्या सुमारास हा प्रसंग घडला असं ती म्हणाली.
त्यानंतर आम्ही आरडाओरड करू लागलो. तुम्ही आम्हाला रेट कसं विचारू शकता असं म्हणत ओरडायला सुरूवात केली तेव्हा त्या माणसांचा ग्रुप तिथून पळून गेला. परंतु आमच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही. आम्ही ३-५ वर्षापासून दिल्लीत राहतोय पण कधीही असं घडलं नाही. त्यातील काही जण सॉरी सॉरी म्हणत पळून गेले. त्यानंतर आम्ही पोलिसांना बोलावलं त्यांनी चेष्टेवारी हा विषय नेत काही कारवाई केली नाही असं मुलीने सांगितले.
आम्ही तिथून निघून जात असताना काही अंतरावर पुन्हा त्या माणसांचा ग्रुप दिसला. त्यांनी त्यांची तोंड लपवली. त्यावेळी आम्ही व्हिडीओ बनवला. मुलगी म्हणाली एका पोलीस कर्मचाऱ्याने विचारलं की, तुम्ही डान्सर आहात का? मी सांगितलं नाही स्टूडेंट आहे. त्यानंतर पोलिसाने विचारलं ठाण्यात डान्स करणार का? मी जसं फोन काढला तो पळून गेला. ही घटना ना मध्यरात्री २ ला घडली ना रात्री १२ ला. रात्रीचे ११ वाजले होते. आपण कुठे सुरक्षित आहोत? ज्या पोलिसांवर विश्वास ठेऊ शकतो तेदेखील अशाप्रकारे वागत असतील तर काय करू शकतो? हा व्हिडीओ सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेअर करावा असं मुलींनी सांगितलं.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी त्याची दखल घेतली. हे प्रकरण गंभीर असून पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे. यासाठी दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत त्यांच्याकडे कोणतीही तक्रार मिळाली नाही. पीडित मुलींना शोधून तक्रार दाखल करण्यात येईल असं पोलीस म्हणाले.