नवी दिल्ली: दिल्लीउच्च न्यायालयाने एका व्यक्तीला अनोखी शिक्षा ठोठावली आहे. २०० विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि डासांपासून बचावासाठी काही औषधे वाटण्याची शिक्षा संबंधित व्यक्तीला देण्यात आली आहे. ही अनोखी शिक्षा ऐकून सर्वांनाच आश्चर्य झाले आहे मात्र ही दिल्लीतील सत्य घटना आहे. दरम्यान, दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एका अमेरिकन व्यक्तीकडून कोणतीही कागदपत्रे नसताना एक काडतूस जप्त करण्यात आले होते. अवैधरित्या काडतूस बाळगल्याप्रकरणी अमेरिकन नागरिकाच्या विरोधात शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला.
हे काडतूस माझ्याकडे चुकून आल्याचे संबंधित व्यक्तीने न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सांगितले. यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी आपल्या आदेशात म्हटले की, व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे पोलिसांचा खूप वेळ वाया गेला आहे. त्यामुळे त्याला आता काही समाजकार्य करायला हवे. कोर्टाने सॅनिटायझर आणि डासांपासून बचावासाठी काही औषधे वाटण्याची शिक्षा दिल्याने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यात आला.
सॅनिटायझर वाटण्याची दिली शिक्षा
आरोपी व्यक्तीला २०० विद्यार्थ्यांसह सरकारी किंवा महापालिका शाळेत सॅनिटायझर आणि डासांपासून बचाव करणारे औषध वाटप करावे लागेल, असे न्यायालयाने सांगितले. सरकारी वकील तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शाळेची निवड करतील आणि त्यानंतर तेथे सॅनिटायझर आणि इतर औषधांचे वाटप केले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.