लग्नाच्या गाठी देवाच्याच द्वारी बांधल्या गेलेल्या असतात असं म्हणतात. त्यामुळे प्रत्येकाचं लग्न त्या त्या वेळेनुसार होत असतं. पण काहींना लग्नासाठी वर किंवा वधू शोधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. वधू किंवा वर अगदी नातेवाईकांपासून ते मॅट्रिमोनिअल जाहिराती आणि वेबसाईट्सवर शोधले जातात. नुकतंच एक आगळीवेगळी जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे. ज्यात एका तरुणीनं इच्छित वराची जाहिरात दिली आहे आणि त्यासाठी ठेवलेल्या अटी खरंतर चर्चेचा विषय बनल्या आहेत.
व्हायरल होत असलेला फोटो हा एक स्क्रीनशॉट आहे ज्यामध्ये वधूकडून मोठी मागणी करण्यात आली आहे. जी सामान्य नाही. मुलीने तिची मागणी अगदी एखाद्या बायोडेटा प्रमाणे सादर केली आहे आणि सांगितले आहे की वराचा जन्म जून, 1992 पूर्वी झालेला नसावा. मुलाचे घर दिल्ली-एनसीआरमध्ये असावे आणि त्याची उंची 5 फूट 7 इंच ते 6 फूट इतकीच असावी. घरात 2 पेक्षा जास्त भावंडे नसावीत आणि कुटुंब सुशिक्षित असावे. (नोकरी किंवा बिझनेस क्लास) यासोबतच मुलाकडे MBA, MTech, MS, PGDM ची पदवी असणे आवश्यक आहे आणि तेही IIT, NIT सारख्या संस्थेतून त्याचं शिक्षण झालेलं असावं. मुलगा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा हवा आणि त्याचा पगार 30 लाख/वार्षिक पेक्षा कमी नसावा.
तरुणीनं दिलेल्या जाहिरातीतील अटी वाचून सोशल मीडियात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणी तिला नवरा नको, एटीएम हवंय असं म्हटलंय. तर कुणी अशा अटी पूर्ण करणारा नवरा मिळणं मुश्कील असून तरुणीवर अविवाहित राहण्याची वेळ येईल अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर ही लग्नासाठीची जाहिरात नसून नोकरीसाठीचा अर्ज असल्याचं म्हणत खिल्ली उडवली आहे.