माणसांना घोड्याच्या पाठीवर बसलेलं आपण अनेकदा बघतो. पण माणसाच्या पाठीवर घोडा असं चित्र कधी बघायला मिळत नाही. सध्या ट्विटरवर अशाच एका व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एक व्यक्ती घोड्याला खांद्यावर घेऊन जात आहे. यासोबतच असाही दावा करण्यात आला आहे की, एका विषारी सापाने चावल्याने हा व्यक्ती घोड्याला पाठीवर घेऊन साधारण ५ किमी अंतरापर्यंत चालत राहिला. या घोड्याचं वजन ४०० ते ५०० किलो असल्याचं सांगितलं जात आहे.
ट्विटर यूजर Kevin W याने १४ जानेवारीला हा व्हिडीओ ट्विट केला होता. त्यासोबत लिहिले होते की, घोड्याला साप चावल्याने हा व्यक्ती घोड्याला खांद्यावर घेऊन ५ किमी चालला. आता घोडा आणि व्यक्ती दोघेही ठीक आहेत.
सत्य काय आहे?
घोड्याला खांड्यावर उचलण्याचा दावा खरा आहे. पण त्यामागे सांगितली जाणारी कथा मात्र खोटी आहे. कारण हा व्यक्ती यूक्रेनचा वेटलिफ्टर दमित्रो खालाजी आहे. आणि त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. त्याच्या नावावर ६३ वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. त्याने वेगवेगळे स्टंट करुन हे रेकॉर्ड नावावर केले आहेत. हा घोड्याला खांद्यावर घेऊन जाणेही यातीलच एक रेकॉर्ड असल्याचं समजतं. म्हणजे काय तर घोड्याला साप चावल्यामुळे त्याला खांद्यावर घेऊन जात असल्याची बाब खोटी आहे, हे समोर आलं आहे.