मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाशच्या लग्नात सैन्याचा 'वापर' केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टसोबत नीता अंबानी यांचा जवानांसोबतचा एक फोटोदेखील शेअर करण्यात येत आहे. अनेकजण यावरुन मोदी सरकारवर टीका करत आहेत.
पोस्टमधील दावा काय?'भारताचं अभिनंदन! मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नात आपल्या सैन्याचा वापर केला जात आहे. भाजपा/आरएसएसच्या 5 वर्षांच्या राजवटीत आपण इथं येऊन पोहोचलोय. लज्जास्पद!,' असा मजकूर लिहिलेली पोस्ट अनेकजण शेअर करत आहेत. यासोबत नीता अंबानींचा फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये त्या गणवेशातील जवानांसोबत उभ्या आहेत. 'एका श्रीमंत व्यक्तीच्या कार्यक्रमात आपल्या सैन्याचा वापर केला जात आहे. भारत म्हणजे एक विनोद झालाय. संपूर्ण जग आपल्यावर हसतंय', अशी एक पोस्टही व्हायरल झाली आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ऍपवर या फोटोची आणि त्यासोबतच्या मजकुराची जोरदार चर्चा आहे.
सत्य काय?नीता अंबानींचा हा फोटो खरा आहे. मात्र त्यासोबत असलेला मजकूर चुकीचा आहे. अंबानींकडून सुरक्षा दलातील 7 हजार कर्मचाऱ्यांसाठी म्युझिकल फाऊंटन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात हा फोटो काढण्यात आला.
फोटोची पडताळणी कशी केली?नीता अंबानींचा जवानांसोबतचा फोटो इंटरनेटवर सर्च केल्यास याबद्दलचं सत्य समोर आलं. अनेक संकेतस्थळांनी हा फोटो बातमीत वापरला आहे. 'मुलगा आकाशच्या भव्यदिव्य लग्न सोहळ्यानंतर मुकेश आणि नीता अंबानी यांच्याकडून सैन्य आणि पोलीस दलातील 7 हजार कर्मचाऱ्यांसाठी म्युझिकल फाऊंटन शोचं आयोजन', अशा आशयाची माहिती फोटो सर्च केल्यानंतर मिळते. या कार्यक्रमाला लष्कर, नौदल, निमलष्करी दल, मुंबई पोलीस, रेल्वे सुरक्षा दलांचे कर्मचारी त्यांच्या कुटुंबांसह उपस्थित होते. बांद्र्यातील जिओ वर्ल्ड सेंटरमधल्या धीरुभाई अंबानी स्क्वेअरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशाच्या संरक्षणासाठी अविरत झटणाऱ्या सुरक्षा दलांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.