आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करुन ते आठवणी स्वरुपात जपण्याचं काम सर्वचजण करत असतात. त्यात, घरातील आनंदाचे क्षण प्राधान्याने येतात. लग्नसोहळा त्यापैकीच एक. कितीही गरीब कुटुंबातील व्यक्ती असली तर लग्नात फोटो काढून ती आठवण जपण्याचं काम केलं जात. तर, अनेकजण लग्नसोहळ्यातील फोटोग्राफीवर लाखो रुपये खर्च करतात. नुकतेच प्री विडींग फोटोशूटचा नवा ट्रेंड आला आहे. लग्नाआधी नवं जोडपं लोकेशन ठरवून फोटोशूट करतं. त्यानंतर, लग्नाचंही काम त्याच फोटोग्राफरकडे असतं. त्यामुळे, फोटोग्राफर हा प्रत्येकाच्या लग्नाचा एक अविभाज्य घटक बनलाय. मात्र, एका महिलेनं लग्नाच्या ४ वर्षानंतर फोटोग्राफरला संपर्क साधत वेगळीच डिमांड केलीय. याचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
एका महिलेनं लग्नाच्या ४ वर्षानंतर फोटोग्राफरला संपर्क साधत लग्नातील खर्चाचे पैसे परत मागितले आहेत. सुरुवातीला या फोटोग्राफरला ही टिंगल वाटली, पण महिलेनं खरंच ही मागणी केल्याचे लक्षात आल्यानंतर तोही अवाक् झाला. यावेळी, फोटोग्राफरने महिलेला पैसे परत देण्यास नकार दिला, तसेच दोघांमधील व्हॉट्सअप चॅटही व्हायरल केले. आता, फोटोग्राफरचे हे चॅट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. लैंस रोमियो नावाच्या फोटोग्राफर अकाउंटवरुन हे चॅट व्हायरल करण्यात आलं असून फोटोग्राफरने आपलं आयुष्य एकदम फिल्मी असल्याचं म्हटलंय.
महिलेचा मेसेज काय?
मला नाही माहिती की, तुम्हाला मी लक्षात आहे की नाही. पण, तुम्ही २०१९ मध्ये डर्बन येथे माझ्यासाठी लग्नासाठी माझं फोटोशूट केलं होतं. मात्र, आता माझा घटस्फोट झाला असून मला व माझ्या घटस्फोटीत पतीला या फोटोंची काहीही गरज नाही. तुम्ही खरंच खूप सुंदर काम केलं होतं, पण ते आता बेकार आहे. कारण, आमचा घटस्फोट झालाय. त्यामुळे, जे पैसे मी तुम्हाला दिले होते, ते मला परत हवे आहेत. कारण, मला या फोटोंची गरज नाही.
दरम्यान, फोटोग्राफरने पैसे परत करण्यास नकार दिला. मात्र, आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचं महिलेनं म्हटलं. त्यावर, फोटोग्राफरने कारवाई करण्यास सहमती दर्शवली. पण, हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या पतीन फोटोग्राफरशी संपर्क साधला. तसेच, या घटनेबद्दल मी माफी मागतो असे म्हणत महिलेचं कृत्य योग्य नसल्याचं म्हटलं आहे.