मुक्ता चैतन्य, मुक्त पत्रकार
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स लिखित शब्दांकडून झपाट्याने दृक्श्राव्य झाले आहेत. अधिक व्ह्यूज, अधिक फॉलोअर्स आणि अधिक सबस्क्रायबर्स असतील तरच अपेक्षित पैसे, या गणितात सतत रंजक आणि खिळवून ठेवणारा कंटेन्ट बनवण्याचे प्रेशर कंटेन्ट क्रिएटर्सवर असते. रील्स/शॉट्सवर दिसणारा मजकूर ही क्रिएटिव्हिटी आहे का? असा विषय दरवेळी चर्चेला येतो. विशेषतः जेव्हा कंटेन्ट क्रिएटर्स वेगळे, हटके काहीतरी करण्याच्या नादात त्यांचे जीव गमावतात तेव्हा.
मुळात सोशल मीडियावरच्या कंटेन्टकडे कसे पाहिले पाहिजे, याबाबत आपण अजूनही बऱ्यापैकी गोंधळलेल्या अवस्थेत आहोत. लिखित स्वरूपात जो मजकूर ऑनलाइन जगात आहे तो एरव्हीच्या पुस्तकी दीर्घ लेखनासारखा नसतो. त्यामुळे त्याला कमी लेखण्याचा आणि त्याचा क्रिएटिव्हिटीशी संबंध नसल्याचा समज अनेकदा होतो. पण कमी शब्दांत किंवा वेळेत परिणामकारक पद्धतीने विषयाची मांडणी करणे हे सगळ्यात कठीण काम असते. त्यासाठी विषयाची समज, शब्दांची निवड असा सगळाच कस लागतो. लेखकाला बैठक हवी, या पूर्वापार समजावर या माध्यमांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कारण, पूर्वी ज्या माध्यमांमध्ये माणसे व्यक्त होत होती तिथे बैठकीची गरज होती, एकटाकी कामाचे कौशल्य आवश्यक होते. आज माणसे ज्या माध्यमांमधून व्यक्त होऊ बघत आहेत तिथे आपल्याला काय मांडायचे आहे त्यावर पुरेसा विचार करणे, त्यासाठी निरनिराळ्या इतर माध्यमातील घटकांचा सुयोग्य वापर कसा करता येईल याचा विचार करणे आणि कमी शब्दात किंवा मोजक्या वेळेच्या चौकटीत तो विषय मांडण्याचे कौशल्य विकसित करणे हे कळीचे मुद्दे आहेत.
मग मुद्दा येतो, तयार होणारी सगळी रील्स किंवा शॉट्स दर्जेदार असतात का? तर मुळीच नाही. जसे निर्माण होणारे सगळे सिनेमे, सगळी पुस्तके, सगळ्या कलाकृती या दर्जेदार नसतात. त्यात विविध स्तर असतात, त्याचप्रमाणे रील्स आणि शॉट्समध्ये तयार होणारा सगळा कंटेन्ट दर्जेदार असतो असे नाही. त्यातही सुमार दर्जाच्या गोष्टी तयार होतातच. हे लक्षात घेतले पाहिजे की, सुमार कनंटेन्ट तयार होणे म्हणजे माध्यम वाईट असणे नाही. ते माध्यम जे लोक वापरत आहेत त्यांचा अभ्यास कमी पडला, मेहनत कमी पडली, विचार कमी पडला आणि कौशल्ये कमी पडली की कंटेन्ट सुमार तयार होतो. मग ते रील्स असोत, साहित्य-संगीत-नाटक-सिनेमे नाहीतर कुठलीही इतर कलाकृती.
सोशल मीडिया आणि त्यातही शॉर्ट फॉर्म व्हिडीओ कंटेन्ट म्हणजेच रील्स, शॉट्स हे सगळे माध्यम प्रकार अजून फारच नवीन आणि बाल्यावस्थेत आहेत. जसजशी ही माध्यमे उत्क्रांत होतील, काळाच्या ओघात बदलतील तसतसा कंटेंटचा दर्जाही हळूहळू बदलत जाईल. शिवाय या माध्यमामध्ये तंत्रज्ञानाचा वाटा बराच मोठा आहे. कंटेन्टमागचा विचार जितका महत्त्वाचा आहे तितकेच एडिटिंगचे कौशल्य आवश्यक आहे. थोडक्यात मुद्देसूद सांगता येणे हेही कौशल्य आहे आणि ते सगळ्यांकडे नसते. ज्याला आपण ‘झटकन विचार केला आणि पटकन सांगितला’ असे समजतो ते अनेकदा वाटते तितके उथळ नसते. त्यामागेही मेहनत असते, विचार असतो. अर्थात व्ह्यूजच्या मोहजालात हटके कंटेन्ट बनवण्याच्या नादात नको तिथे रिस्क घेऊन जीव धोक्यात घालून कंटेन्ट बनवण्याइतके ते महत्त्वाचे असते का? पण समाज म्हणून आपण माध्यम शिक्षित नसल्याने या वेगवान माध्यमाचा विचार कसा करायचा हे कुणीही सांगत नाही. कंटेन्ट बनवताना माध्यमभान आणि डिजिटल विवेक सुटता कामा नये, हेच खरे!