विंचवाने चावले जर त्याच्या विषाने जीव जाऊ शकतो हे सर्वांनाच माहीत आहे. पण विंचवाच्या विषाचा वापर अनेक औषधे तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळेच विंचवाच्या विषाला जगात सर्वात जास्त किंमत मोजली जाते. विंचवाच्या एक लिटर विषाची किंमत ७६ कोटी रुपये इतकी आहे. पण यासाठी एक खासप्रकारचा विंचू हवा.
निळ्या विंचवाच्या विषापासून विडसटॉक्स नावाचं औषध तयार केलं जातं. आणि हे औषध कॅन्सरसारखा आजार मुळातून नष्ट करण्यासाठी वापरलं जातं. या औषधाला क्यूबामध्ये चमत्कारी औषध मानलं जातं.
सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ४० मिलियन लोकांनी आतापर्यंत पाहिला आहे. तर साधारण ४ लाख ४७ हजार लोकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ हेशम अल-गलील नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये सांगण्यात आलं आहे की, विंचूच्या एक लिटर विषाची किंमत ७५ कोटी ८६ लाख २२ हजार ३६२ रुपये आहे. म्हणजे विंचवाचं विष हे थायलंडच्या जगप्रसिद्ध किंग कोब्रापेक्षाही जास्त महाग विकलं जातं. किंग कोब्राच्या एक लिटर विषाची किंमत भारतीय रुपयांमध्ये ३० कोटी २४ लाख ५४० रुपये इतकी आहे. असे सांगितले गेले आहे की, विंचवाच्या विषामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त घटक असतात ज्यांची ओळख अजून करणे बाकी आहे. त्यामुळे विंचवाच्या विषांची मागणी वाढली आहे.