जोधपूर : राजस्थानमधील जोधपूर येथून एक विचित्र घटना उघडकीस आली आहे, जिथे डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून तब्बल ६३ नाणी काढली आहेत. संबंधित व्यक्तीला पोटदुखीचा अचानक त्रास जाणवू लागल्याची तो तक्रार करू लागला. यानंतर जोधपूर मधील एमडीएम रूग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी एंडोस्कोपिक प्रक्रियेच्या माध्यमातून २ दिवसांमध्ये व्यक्तीच्या पोटातून ६३ नाणी बाहेर काढली. मात्र व्यक्तीच्या पोटात एवढी नाणी आढळल्याने डॉक्टरांना देखील धक्का बसला आहे.
दरम्यान, संबंधित व्यक्तीच्या पोटदुखीची डॉक्टरांनी तपासणी केली होती. तपासणी दरम्यान पोटात धातूची गाठ असल्याचा संशय आला परंतु ही कोणतीही गाठ नसून ही धातूची नाणी असल्याचे उघड झाले. विशेष प्रक्रिया करून शरीरातील नाणी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
तणावामुळे गिळली होती नाणीडॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय व्यक्तीने तणावामुळे दोन दिवसांमध्ये एक रूपयांची तब्बल ६३ नाणी गिळली होती. तो बुधवारच्या दिवशी पोट दुखत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे आला होता. व्यक्तीने डॉक्टरांना सांगितले होते की, त्याने १०-१५ नाणी गिळली आहेत, जी नाणी एक्सरेमध्ये एका धातूच्या गाठीप्रमाणे दिसत होती. डॉक्टर नरेंद्र भार्गव यांनी व्यक्तीच्या कुटुंबियांनी त्याच्यावर मानसिक उपचार करावे असा सल्ला दिला आहे. सध्या रूग्णांची प्रकृती स्थिर असून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज दिला आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.