नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची एकूण संख्या तब्बल दीड कोटीवर पोहोचली आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत.
देशभरातील अनेक रुग्णालयाकडे असलेला ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. रुग्णालयातील डॉक्टर हतबल झाले असून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना या परिस्थितीची स्पष्ट कल्पना देण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन नसेल तर उपचार कसे होणार? असा सवाल करत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी डॉक्टर प्रशासनाकडे करीत आहेत. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर डॉक्टरांचं एक प्रिस्क्रिप्शन जोरदार व्हायरल होत आहे. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झालेला असताना सर्वत्र याच प्रिस्क्रिप्शनची चर्चा रंगली आहे. एका डॉक्टरने आपल्या रुग्णाला आजारातून बरं झाल्यावर एक झाड लावण्याचा सल्ला दिला आहे.
संजीवनी हॉस्पिटलच्या डॉ. कोमल कासार यांचं एक प्रिस्क्रिप्शन सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी मराठीत "आजारातून बरा झाल्यावर एक तरी झाड लावा म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन कमी पडणार नाही" असं म्हटलं आहे. खरं तर लहानपणापासून आपण झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा हे शिकत आलो आहेत. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतान आता ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर दिलेला हा सल्ला अत्यंत मोलाचा ठरत आहे.
ऑक्सिजनअभावी देशातील अनेक रुग्णालयात रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक ठिकाणी साठा उपलब्ध नसल्याने कित्येक रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. दिल्लीच्या जयपूर गोल्ड रुग्णालयामध्ये ऑक्सिजन अभावी 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील बत्रा आणि सर गंगाराम रुग्णालयामध्येही काही वेळ पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे.
कोरोनाचा हाहाकार! सलग तिसऱ्या दिवशी 3 लाखांचा टप्पा पार; रुग्णसंख्या तब्बल दीड कोटीवर
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,46,786 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2,624 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,66,10,481 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,89,544 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (24 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,89,544 वर पोहोचला आहे.