मनुष्य आणि प्राण्यांची मैत्री फारच खास असते. कुत्रा हा मनुष्याचा सर्वात चांगला मित्र आणि प्रामाणिक प्राणी मानला जातो. पुन्हा एकदा हे कुत्र्याने सिद्ध करून दाखवलं की, अखेर त्यांना मनुष्याचा सर्वात आवडता प्राणी का म्हटलं जातं. कॅनडात एका छोट्याशा मेसी नावाच्या कुत्र्याने १० वर्षीय लिली क्वान नावाच्या मुलीची जीव वाचवण्यासाठी एका कोल्ह्यासोबत पंगा घेतला. हा छोटासा कुत्रा कोल्ह्यासोबत तेव्हापर्यंत लढत राहिला जोपर्यंत मुलगी पळून सुरक्षित ठिकाणी जात नाही.
या भावूक करणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, लिली क्वान मेसीसोबत मॉर्निंग वॉकला गेली होती. मात्र, टोरांटोच्या स्कारबोरोमध्ये एक कोल्हाच्या प्रजातीचा प्राणी लिलीच्या मागे लागतो. ज्यामुळे ती घाबरून धावत सुटते. यादरम्यान तिला वाचवण्यासाठी छोटासा मेसी त्या प्राण्यासोबत भिडतो. (हे पण वाचा : मुलीचा जीव वाचवण्यासाठी खतरनाक कोल्ह्याशी भिडला छोटासा कुत्रा, लोक म्हणाले - हा आहे खरा साथी!)
मेसी लिली सुरक्षित ठिकाणी पोहोचेपर्यंत त्या प्राण्यासोबत लढत राहिला. या प्राण्याला लिलीपर्यंत पोहोचायचं होतं. पण मेसीने त्याला तिच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्यासोबत तो दोन हात करत राहिला. यादरम्यान त्या प्राण्याने मेसीला गंभीर जखमीही केली. पण मेसीने हार मानली नाही. मेसीच्या अंगातून रक्त वाहू लागलं होतं तरी तो लढत राहिला.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोकांनी मेसीला हिरो म्हटलं आहे. लोक भरभरून त्याचं कौतुक करत आहेत. मेसीला जखमी झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. या घटनेबाबत लिलीची आई डोरोथी क्वान म्हणाली की, ती तिच्या कामावर गेली होती. पण जशी तिला मुलीवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळाली. ती सगळं काही सोडून घरी परत आली.