अनेकदा माणसं हे विसरून जातात की कुत्रा हादेखील एक जीव आहे आणि त्यालाही भावना आहेत. अनेकदा हा प्राणी माणसांशिवाय इतर प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठीही आपला जीव धोक्यात घालतो. सध्या अशाच एका श्वानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक श्वान न घाबरता पाण्यात उडी घेऊन एका खारूताईचा जीव वाचवतो (Dog saves life of squirrel).
भारतीय वनसेवा अधिकारी आणि ट्विटरवर निसर्ग आणि प्राण्यांचे अनोखे व्हिडिओ शेअर करणारे सुशांत नंदा यांनी नुकताच एक नवीन व्हिडिओ (Viral Video of Brave Dog) शेअर केला आहे. ज्यामध्ये कुत्र्याचं धाडस स्पष्टपणे दिसतं. व्हिडिओ क्रेडिट देताना त्यांनी Yoda4ever नावाच्या ट्विटर अकाऊंटचा उल्लेख केला आहे, ज्यावर प्राण्यांशी संबंधित अनोखे व्हिडिओ शेअर केले जातात.
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट झालं नसलं तरी व्हिडिओमध्ये एक बोट पाण्यातून चाललेली दिसते. त्यावर लष्कराचा एक जवानही दिसत आहे. अचानक एक कुत्रा बोटीतून पाण्यात उडी मारतो आणि काही अंतर पोहतो. तेव्हा पाण्यात अडकलेली एक खारूताई दिसते. कुत्रा तिच्याजवळ पोहोचताच तिला आपल्या चेहऱ्यावरच बसवतो आणि नावेपर्यंत आणतो. श्वानाच्या धाडसाचं चांगलंच कौतुक होत आहे, कारण व्हिडिओमध्ये दिसतं की श्वानाच्या मानाने हे पाणी खोल आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सुशांत नंदा यांनी लिहिलं, कुत्रा पाण्यात उडी घेतो आणि बुडणाऱ्या खारीला वाचवतो. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे. अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. काहींनी लिहिलं की हे दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. श्वानांच्या धाडसाचा प्रत्यय देणारा हा पहिलाच व्हिडिओ नाही, तर याआधीही अनेकदा असे व्हिडिओ समोर आले आहेत.