कुत्रा हा प्राणी मनुष्यासोबत किती इमानदार असतो याची वेळोवेळी अनेक उदाहरणे आपण ऐकत आणि पाहत असतो. असंच एक उदाहरण अमेरिकेतील वॉशिंग्टनमधून समोर आलं आहे. इथे एक कुत्रा त्याच्या मालकाच्या मृतदेहाजवळ तासंतास बसून राहिला आणि पोलीस येत असल्याचं कळताच जोरजोरात भूंकू लागला.
झालं असं की, मृत व्यक्ती त्याच्या कुत्र्याला घेऊन जंगलात हायकिंगसाठी गेली होती. दरम्यान घनदाट जंगलात पडल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला. कुत्रा त्याच्या मृतदेहाजवळ पोलीस येईपर्यंत तसाच बसून राहिला.
ही पोस्ट Pierce County Sheriff's Department ने शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की, ६४ वर्षीय व्यक्ती डॉगी डेजीसोबत हायकिंगसाठी गेला होता. ही व्यक्ती नेहमीच पत्नीला न सांगताच डेजीसोबत हायकिंगसाठी जातो. पण यावेळी बराच अंधार होऊनही जेव्हा तो घरी परतला नाही तेव्हा त्याच्या पत्नीने पोलिसांना फोन केला. दुसऱ्या दिवशी ३ वाजता त्यांची कार मिळाली. त्यानंतर एक तासांनी सर्च टीमला कुत्र्याचा भूंकण्याचा आवाज ऐकू आला.
कुत्र्याच्या आवाजाच्या दिशेने पोलीस गेले आणि तेव्हा त्यांना या व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, डेजीसारख्या इमानदार प्राण्यामुळेच ते हे सर्च ऑपरेशन पूर्ण करु शकले.