प्राण्यांमध्येही माणसांप्रमाणेच भावना, समजूतदारपणा, दया हे गुण असतात. पाहणाऱ्यांना त्यांच्यातील हे चांगले गुण नेहमीच दिसतात (Animal Lovers). मात्र न पाहणाऱ्यांना प्राण्यांमध्ये काहीच विशेष दिसत नाही. विशेषतः कुत्र्याबद्दल बोलायचं झालं तर या प्राण्याला अतिशय ईमानदार प्राण्यांमध्ये गणलं जातं. कित्येक वर्षांपासून त्यांना मनुष्याचा जवळचा मित्र म्हटलं जातं. सोशल मीडियावर श्वानांचे निरनिराळे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही व्हिडिओ भावुक करणारे, जे पाहूनच डोळ्यात पाणी येतं.
सध्या असाच एक इमोशनल व्हिडिओ (Emotional Video of Dogs) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात श्वानांनी केलेलं काम पाहून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये दिसतं की काही श्वानांनी आपल्या एका साथीदाराचं निधन झाल्यानंतर त्याला जमिनीत पुरलं. तुम्ही पाहू शकता, की खड्ड्यामध्ये एक मृत श्वान पडलेला आहे आणि त्याच्या चारही बाजूने इतर श्वान आहेत. हे सर्व त्याच्यावर माती टाकत आहेत आणि त्याला दफन करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हा व्हिडिओ इमोशनल करणारा आहे. व्हिडिओ पाहून समजतं की प्राण्यांमध्येही प्रेमाची भावना आणि समजूतदारपणा भरपूर आहे. आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी आश्चर्यचकीत होऊन या व्हिडिओला कॅप्शन दिलं, की 'हे प्राणीच आहेत का?'. अवघा ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत दीड लाखाहून अधिकांनी पाहिला आहे तर ११ हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.
लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, कुत्र्यांना नेहमी पायाने माती फेकताना पाहिलं, मात्र या व्हिडिओमधून त्यांच्या भावना समजतात. आणखी एकाने लिहिलं, यापेक्षा चांगला शेवटचा निरोप आणखी काय असू शकतो. प्राणी माणसांपेक्षा जास्त प्रामाणिक आणि संवेदनशील असतात.