कौटुंबिक हिंसाचार हा मुद्दा जगभरात गंभीर होत आहे. यातून कित्येक महिलांसोबत घरात गैरव्यवहार केला जातो, तर अनेक महिलांचा पती जीव घेतात. तुर्कीतील एका आर्टिस्टने लोकांसमोर ही गंभीर समस्या मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे. यासाठी तुर्कीमध्ये एक अनोखं दृश्य तयार करण्यात आलं, जे बघून तुम्हालाही वाटेल की, कौटुंबिक हिंसाचाराविरोधात एकजुट होण्याची गरज आहे.
तुर्कीतील इस्तांबुलमध्ये एका इमारतीवर सॅंडलचे ४४० जोड लटकवण्यात आले आहेत. तुर्कीच्या आर्टिस्टने या सॅंडलच्या माध्यमातून देशातील त्या महिलांची आठवण जागवली, ज्यांना गेल्या काही वर्षात पतीच्या हातून जीवे मारण्यात आलं.
आर्टिस्टने नारी शक्ती आणि त्यांच्या स्वातंत्र चिन्हाच्या रूपात हाय-हिल्सचा वापर केला. सोबतच तुर्कीच्या काही भागांमध्ये एखाद्याच्या मृत्यूनंतर सॅंडल किंवा शूज असे बाहेर ठेवण्याची परंपरा आहे. परिवार दु:खात शूज बाहेर ठेवतात.
ही भिंत वाहित टून या आर्टिस्टने सजवली आहे. वाहित तुर्कीतील एक प्रसिद्ध आर्टिस्ट आणि ग्राफीक डिझायनर आहे.
वाहितने या आर्टसाठी इस्तांबुलचं केंद्र निवडलं. जेणेकरून त्यांचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. हे ४४० सॅंडल त्यांनी ६ महिन्यांसाठी प्रदर्शनासाठी ठेवले आहेत.