दुबईतील प्रसिद्ध हॉटेल ‘बुर्ज अल अरब’ समोर शूट केलेल्या व्हिडिओवरुन आता सोशल मीडियावर वादळ निर्माण झालं आहे. या व्हिडिओमध्ये वाघाच्या वापराबद्दल नेटिझन्स प्रचंड संतापले आहेत. हा व्हिडिओ lovindubai ने त्याच्या अधिकृत Instagram अकाऊंटवर अपलोड केला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओत असं काय आहे की ज्यामुळे नेटकरी संतप्त आहेत ते पाहा...
व्हायरल झालेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये एक वाघ समुद्रकिनाऱ्यावर काही फुग्यांसोबत खेळताना दिसत आहे, तर त्याच्या मागे दुबईतील प्रसिद्ध हॉटेल ‘बुर्ज अल अरब’ दिसत आहे. ‘लव्ह इन दुबई’ नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर असं लिहिले आहे की, ‘जेंडर रिव्हिल्स इन दुबई बी लाईक’. आपल्याकडे डोहाळजेवणावेळी बर्फी आणि पेढा ठेऊन होणाऱ्या आईला गंमत म्हणून मुलगी कि मुलगा होणार हे निवडण्याचा खेळ असतो त्याला पाश्चिमात्य देशात जेंडर रिव्हिल्स (gender reveals) असे म्हणतात. या व्हिडिओत हा खेळ वाघाकडून खेळुन घेतला जात आहे...
वाघांसारख्या जंगली प्राण्यांच्या सार्वजनिक वापरावर नेटकरी भडकले आहेत. वाघांकडून असे स्टंट करुन घेणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. एका युजरने लिहलं आहे की, अशा प्रकारचा मूर्खपणा ताबडतोब थांबला पाहिजे. त्याचवेळी दुसर्याने प्रश्न विचारला आहे की, तुम्ही तुमच्या अकाऊंटवरुन असल्या फालतू गोष्टी काय प्रमोट करता? त्याच वेळी, आणखी एकाने लिहिले आहे, यात गर्व करण्यासारखे काही नाही, ते पाळीव प्राणी नाही तर भयानक प्राणी आहे. अनेक युजर्स सार्वजनिक ठिकाणी वन्य प्राणी आणणे कायदेशीर आहे का असा प्रश्न विचारत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, काही काळापूर्वी दुबई पोलिसांनी इशारा दिला होता की कोणत्याही वन्य प्राण्याला सार्वजनिक ठिकाणी नेणे हा अमिरातीच्या कायद्यांतर्गत गुन्हा मानला जाईल. त्यानंतर दुबई पोलिसांनी असेही म्हटले होते की, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पण काही लोक अजूनही सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी असे डावपेच अवलंबत आहेत.