देशात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत आहे. टोमॅटोचा वाढता भाव पाहता अनेक भन्नाट गोष्टी समोर येत आहेत. भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत, तर विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती देखील यावर व्यक्त होत आहेत. एकेठिकाणी तर टोमॅटो सांभाळण्यासाठी बाऊन्सर ठेवल्याचे चित्र दिसले. टोमॅटोचे भाव वाढल्याने झालेल्या गदारोळानंतर सरकारने त्याचा भाव ८० रुपये प्रतिकिलो केला आहे. तरीदेखील लोक अजूनही अधिक स्वस्त टोमॅटो मिळतात काय त्याच्या शोधात आहेत. थेट दुबईतून मागवले टोमॅटोदरम्यान, एका महिलेने दुबईत राहणाऱ्या तिच्या मुलीकडून १० किलो टोमॅटो मागवले असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित महिलेची मुलगी सुट्टीनिमित्त मुलांसोबत भारतात येणार आहे. म्हणूनच भारतात टोमॅटोचा अधिक भाव असल्याने या महिलेने थेट दुबईतून टोमॅटो मागवले. आईच्या मागणीनुसार, मुलीने १० किलो टोमॅटो पॅक करून भारतात पाठवले. टोमॅटो पाठवणाऱ्या मुलीच्या बहिणीने ट्विटरवर ही माहिती दिली.
नेटकऱ्यांनी घेतली फिरकी टोमॅटो दुबईतून मागवल्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देऊन आई आणि मुलीच्या नात्याचे मिश्किलपणे कौतुक करत आहेत. एका युजरने म्हटले, "या महागाईच्या काळात सर्वोत्कृष्ट कन्येचा पुरस्कार बहुधा त्या मुलीच्या दिशेनेच जात आहे." तर, "मुलगी तिच्या आईला दुबईला का घेऊन जात नाही आणि भारतात टोमॅटोचे भाव खाली येईपर्यंत तिथे का ठेवत नाही?", असेही काहींनी म्हटले आहे.