तिरुवनंतपुरम : केरळमध्ये ट्रॅफिक पोलिसांचा एक अजब कारनामा समोर आला असून, त्यावरून सोशल मीडियावर ताशेरे ओढले जात आहेत. वैध प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र न दाखवल्यामुळे केरळ वाहतूक पोलिसांनी चक्क इलेक्ट्रिक स्कूटरच्या मालकाला दंड ठोठावला आहे.
वास्तिवक, इलेक्ट्रिक वाहनांना पीयूसी प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. केरळ पोलिसांना यावरून खूप ट्रोल केले जात असून, ई-स्कूटर आणि चालानचे फोटोही व्हायरल होत आहेत. चालानची रक्कम २५० रुपये असल्याचे दिसत आहे, पावतीमध्ये मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम २१३(५)(ई)चादेखील उल्लेख आहे. अनेक नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना टॅग करून या प्रकरणात लक्ष देण्याचे आवाहन करत आहेत.