Earthquake Operation Theater: आपल्यापैकी अनेकजण देवाला मानतात, पण आजपर्यंत त्याला कोणी पाहिले नाही. आपल्याला काहीही अडचण आली की, आपण देवाचा धावा करतो. पण, पृथ्वीवर जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. याची प्रचिती चीनमधील एका व्हिडिओतून होईल. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत डॉक्टरांची टीम रुग्णाचे ऑपरेशन करत असताना अचान भूकंप येतो...
मिळालेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजता चीनच्या शिनजियांगमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप आला होता. यावेळी न्यूरोसर्जनची एक टीम ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाच्या मेंदूची शस्त्रक्रिया करत होती. भूकंपाने संपूर्ण ऑपरेशन थिएटर हादरायला लागते, पण यामुळे डॉक्टर घाबरुन पळून जात नाहीत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टरांची टीम त्या रुग्णाचे ऑपरेशन सुरुच ठेवते.
भूकंपादरम्यान डॉक्टर एन शुफांग यांच्या टीमने शस्त्रक्रिया पूर्ण केली. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल साईट्सवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडियावर या डॉक्टरांचे खूप कौतुक होत आहे. यावर युजर्स विविध प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने लिहिले की, यामुळेच तुम्ही देवाचे दुसरे रुप आहात. आणखी एकाने कमेंट केली, आमचा तुम्हाला मनापासून सलाम...