मुंबई – अयोध्येत राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने भाजपाने राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन केले होते, अनेक वर्षाच्या संघर्षातून निर्माण होणाऱ्या या मंदिराच्या भूमीपूजनामुळे देशभरात उत्साह आहे, या सोहळ्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक करताना भाजपा नेते थकत नाही.
अशातच राज्यातील भाजपा आमदारा राम कदम यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये ते प्रचंड ट्रोल होत आहे. राम कदम यांनी ट्विट केले आहे की, Todays Proud Moment त्यांनी #Times_Square #USA असा उल्लेख करत एक फोटो अपलोड केला आहे, #AyodhyaBhoomipoojan #ModiHaiTohMumkinHai अशाप्रकारे हॅशटॅगही वापरण्यात आले आहेत. यावर नेटीझन्सने त्यांना ट्रोल केले आहे.
किमान प्रभू रामचंद्राच्या संदर्भात तरी खोटेपणा करु नका, फोटोशॉप्ड करुन फोटो टाकू नका, भंपकबाजी, लबाडी करता हे माहिती पण ती पण कधीतरी नीट करा, नेहमी तोंडावर आपटायची सवय झाली आहे तुम्हाला, नावात काय आहे अशी प्रतिक्रिया समीर गुरव नावाच्या युजर्सने दिली आहे.
अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन सोहळ्याच्यानिमित्त अमेरिकेतील न्यूयॉर्क स्थित टाईम्स स्क्वेअरला प्रभू रामाचा फोटो लावण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र अशाप्रकारे प्रभू रामाचा फोटो त्याठिकाणी दाखवण्यात आला नाही. याठिकाणी जगातील सर्वात मोठी एलएडी स्क्रीन लावलेली आहे. काही मुस्लीम संघटनांच्या विरोधानंतर खासगी कंपनी ब्रांडेड सिटीज यांनी येथे फोटो झळकवण्याचा मानस बदलला.
टाइम्स स्क्वेअर येथील बोर्डाचं व्यवस्थापन खासगी कंपनी ब्रांडेड सिटीज यांच्याकडे आहे. याठिकाणी हिंदू संघटनांनी रामजन्मभूमी सोहळ्याचं चित्रण दाखवण्याचा करार केला होता. त्यामुळे आजच्या सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण तेथे दाखवण्यात येणार होते. यासाठी मोठ्या डिजिटल स्क्रीन हिंदू संघटनांनी भाड्याने घेतल्या होत्या. अमेरिकन मीडियाच्या माहितीनुसार स्थानिक मुस्लीम संघटनांनी याला विरोध केला. हा वाद न्यूयॉर्क महापौर, राज्यपाल, खासदार यांच्याकडे गेल्यानंतर याठिकाणी होणारं प्रसारण थांबवण्याचा निर्णय घेतला गेला.