Eknath Shinde Dharmaveer Viral Video: भाजपा महाराष्ट्रात विरोधी पक्षात असतानाही राज्यसभा आणि विधान परिषद अशा दोनही निवडणुकांमध्ये त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले. भाजपाच्या या विजयानंतर शिवसेनेचे खंदे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काही आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाराज आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असून ते नाराज असल्याचं आता उघड झालं आहे. एकनाथ शिंदे गुजरात भाजपाच्या काही नेत्यांसोबत संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यात वेगळी समीकरणं उदयास येणार का? अशी चर्चा आहे. याच दरम्यान नुकताच प्रदर्शित झालेल्या 'धर्मवीर' चित्रपटाचा एक छोटा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
'धर्मवीर' या सिनेमातील एक व्हिडिओ सध्या मीम्स च्या स्वरुपात एडिट करून बराच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक याच्या तोंडी एक वाक्य आहे. 'एकनाथ कुठाय?' असा त्यांचा डायलॉग आहे. त्यानंतर व्हिडीओमध्ये पुढे एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो वापरण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपामध्ये प्रवेश करणार की वेगळा पक्ष काढणार अशा विविध तर्कांना उधाण आले आहे.
पाहा तो व्हायरल झालेला व्हिडीओ-
दरम्यान, एकनाथ शिंदे हे २८ ते ३० शिवसेनेच्या आमदारांसह गुजरातमध्ये आहेत असे सांगितले जात आहे. आधी १० ते १२ आमदारांचा गट रात्री १० वाजता सूरतला पोहोचला आहे. तर, मंत्री एकनाथ शिंदेंसह इतर आमदार सूरतला पोहोचले असून एकूण २८ आमदारांचा गट गुजरातच्या सूरतमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे गुजरात भाजपकडून या आमदारांना सहकार्य आणि मदत करण्यात येत असल्याचीही माहिती आहे.