एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यतील आहे. यात एका हत्तीच्या पाठीवर जखम झाली आहे. यात दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे वाइल्डलाईफचे कर्मचारी एका जखमी हत्तीवर उपचार करत आहेत. केवळ वाइल्डलाईफ कर्मचारीच नाही तर या हत्तीचे काही मित्रही त्याच्या उपचारात मदत करत आहेत.
हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, जखमी हत्तीवर उपचार करण्यासाठी त्याच्या पायाला दोर बांधून त्याला उभं केलं आहे. जखमी हत्तीवर उपचार करण्यासाठी डॉक्टर दुसऱ्या हत्तीवर बसून आहे. त्यासोबत आणखी एक हत्ती तिथे मदतीसाठी उभा आहे.
आजूबाजूला उभे असलेले लोकही हत्तीवर सुरू असलेले उपचार बघत आहेत. काही लोक याचा व्हिडीओही काढत आहेत. कारण अशाप्रकारच्या गोष्टी नेहमी बघायला मिळत नाहीत. हा व्हिडीओ शेअर करत सुशांत नंदा यांनी कप्शन दिलं आहे की, 'कामावर देवदूत'. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा बघितला जात आहे. कारण इतकं सुंदर दृश्य फार कमी वेळेला बघायला मिळतं.