सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. यामध्ये रस्त्यावरील विक्रेत्यांच्या काही गोष्टी भावूक करतात. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता व्हायरल होत आहे. दिल्लीतील टिळक नगरमध्ये एग रोल विकणाऱ्या मुलाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. जसप्रीत नावाच्या मुलाचं वय अवघं दहा वर्षे आहे. @mrsinghfoodhunter नावाचा फूड व्लॉगर सरबजीत सिंगने त्याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
व्लॉगर सरबजीत विचारतो- बेटा, तू काय खायला देत आहेस?, मुलगा म्हणतो- एग रोल. सरबजीत विचारतो- तुझं वय काय आहे? जसप्रीत उत्तर देतो- दहा वर्षे. मग पुन्हा व्लॉगर विचारतो – हा रोल बनवायला तू कोणाकडून शिकलास? जसप्रीत म्हणतो- वडिलांकडून. पप्पा दुकानात येत नाहीत का? असं विचारल्यावर मुलाने आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
सरबजीतने मुलाला तुझी आई कुठे गेली? असं विचारलं असता, जसप्रीत म्हणाला की, ती पंजाबला निघून गेली. मला तुमच्यासोबत राहायचं नाही असं आईने सांगितलं. मला 14 वर्षांची बहीण आहे आणि मी आमचं घर चालवतो. मी कामासोबतच अभ्यासही करतो. सध्या मी माझ्या काकांकडे राहतो. यानंतर सरबजीतने बेटा, मी तुझ्या हिंमतीला सलाम करतो. या व्हिडीओमुळे तुला इतकं प्रेम मिळेल की बघ तुलाच नंतर मजा येईल असं म्हटलं आहे. यासोबतच त्याने लोकांना मुलांच्या दुकानात येऊन रोल खरेदी करण्यास सांगितलं.
सरबजीतच्या या व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत. त्याच्या दुकानाला नक्कीच भेट देणार असल्याचे अनेकांनी सांगितले. अनेकांनी मुलाचा पत्ताही विचारला. ही काही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वीही अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, जिथे निरागस मुलं जबाबदारी सोपवल्यावर अचानक मोठी होतात.
मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या मुलाचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मागवले आहेत. ते म्हणाले की, महिंद्रा फाऊंडेशन मुलाच्या शिक्षणासाठी मदत करू शकते. तसेच याबाबत ट्विट देखील केलं आहे. साहस, याचं नाव जसप्रीत आहे. पण त्याच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये. तो टिळक नगर, दिल्ली येथे राहतो. कोणाकडे त्यांचा संपर्क क्रमांक असल्यास कृपया शेअर करा. महिंद्रा फाउंडेशनची टीम त्याच्या शिक्षणात मदत करू शकते असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.