युक्रेन आणि रशिया यांच्यातील विनाशकारी युद्ध (Ukraine Russia War) सलग १२ व्या दिवशीही सुरूच आहे. कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन सैन्य सतत बॉम्बचा वर्षाव करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, ज्यात चहूबाजूंला विध्वंसाचं दृश्य दिसत आहे. अशा परिस्थितीत एका बंकरमध्ये आश्रय घेत असलेल्या मुलीचा व्हिडिओ सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे (Emotional Video of Little Ukrainian Girl).
या व्हिडिओमध्ये मुलगी एक गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी भावुक झाले असून संतापही व्यक्त करत आहेत. लोक रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना शिव्या देत आहेयांच्याबद्दल राग व्यक्त करत आहेत आणि सवाल करत आहेत की, या निष्पाप लोकांनी तुमचं काय वाईट केलं?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रशियन बॉम्बहल्ल्यापासून वाचण्यासाठी मुलगी आणि तिचे कुटुंबीय बंकरमध्ये लपलेले दिसत आहेत. त्याच्याशिवाय आणखी अनेक लोक तिथे आहेत. व्हिडिओमध्ये ती मुलगी 'लेट इट गो' हे प्रसिद्ध गाणं गुणगुणताना दिसते. हे गाणं फ्रोजन याचित्रपटातील आहे. मुलीचा हा १ मिनिट ४६ सेकंदाचा व्हिडिओ सर्वांचंच लक्ष वेढत आहे. मात्र, या मुलीचं गाणे ऐकून बहुतांश युजर्सचे डोळे पाणावले आहेत. लोक युक्रेनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी आणि युद्ध लवकरात लवकर संपावे यासाठी प्रार्थना करत आहेत. व्हिडिओमधील मुलीचं नाव अमेलिया असल्याचं सांगितलं जात आहे.
रशियन हल्ल्याच्या भीतीने लोकांनी बंकरमध्ये आसरा घेतल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. यात तुम्ही लोकांचे रडतानाचे आवाजही ऐकू शकता. विशेष म्हणजे, अमेलियाने 'लेट इट गो' गाणं सुरू करताच सगळे शांत बसतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी तो कधी आणि कुठे शूट झाला याबाबत विचारणाही केली आहे. मात्र, अनेकांनी त्याला प्रत्युत्तर देताना लिहिलं आहे की, रशिया चौफेर हल्ले करत असताना हे लोक कुठे आहेत हे विचारू नका. अशा परिस्थितीत त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.