Late in Office: एखाद्या दिवशी जर तुम्ही ऑफिसला थोडं उशिरा पोहोचलात तर बॉसचा ओरडा खाऊ नये म्हणून आपण बरीच कारणं मनात तयार ठेवतो. महिन्यात एक-दोन वेळा ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर तर सगळ्यांनाच होतो. एखादा कर्मचारी दररोजच उशिरा येत असेल तर बॉस त्याच्यावर चिडणं, संतापणं हे क्रमप्राप्तच आहे. पण अमेरिकेतील फ्लोरिडा मध्ये एक विचित्र घटना घडली. एका ऑफिसमध्ये जे घडलं ते वाचल्यावर तुम्ही क्वचितच ऑफिसमध्ये उशिरा पोहोचण्याची चूक कराल. वाचा नक्की काय घडलं.
एक कर्मचारी एका ऑफिसमध्ये सात वर्षांपासून काम करत होता. त्या कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये पोहोचायला २० मिनिटं उशिर झाला. सामान्यपणे एखादा कर्मचारी ऑफिसात पहिल्यांदाच उशिरा पोहोचल्यास कंपनी प्रशासन त्याला समज देऊन पुढे अशी चूक होणार नाही याची काळजी घेण्यास सांगते. पण या कर्मचाऱ्याला मात्र त्याच्या ७ वर्षांच्या नोकरीत पहिल्यांदाच २० मिनिटं उशिरा पोहोचण्याचा चांगलाच फटका बसला. पहिल्यांदाच ऑफिसात २० मिनिटं उशिरा पोहोचल्याने त्या कर्मचाऱ्याला कंपनीने थेट नोकरीवरूनच काढून टाकल्याची धक्कादायक घटना घडली.
कर्मचाऱ्याच्या सहकाऱ्यांचा कौतुकास्पद निर्णय
कर्मचारी एकदा उशिरा आल्याने त्याला कंपनीतूनच काढून टाकण्याच्या निर्णयाचा त्याच्या सहकाऱ्यांनी चांगलाच निषेध केला. 'नो स्टॉप इट स्टेप ब्रो' नावाच्या युजरने 'रेडिट' (Reddit) या 'अँटीवर्क फोरम' (Antiwork forum) वर एक मोठी पोस्ट लिहून एक कौतुकास्पद निर्णय जाहीर केला. 'आमचा एक सहकारी गेली ७ वर्षे आमच्या बरोबर कंपनीत काम करत होता. ७ वर्षांत तो कधीच ऑफिसमध्ये उशिरा आला नव्हता. पण पहिल्यांदा ऑफिसात उशिरा आल्याने त्याला कंपनीतूनच काढून टाकल्याचे आम्हाला समजलं आहे. ही घटना मागच्याच आठवड्यात घडली आहे. आम्हाला सोमवारी याबद्दल माहिती मिळाली. २० मिनिटं उशिरा आल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. आता उद्या आम्ही सर्व कर्मचारी ऑफिसला उशिराने येणार आहोत. आणि जोपर्यंत आमच्या त्या सहकाऱ्याला पुन्हा नोकरीवर रूजू करून घेतलं जात नाही त्या दिवसापर्यंत आम्ही रोज उशिराच येणार आहोत.' ही इंटरनेट पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टला आतापर्यंत ७८ हजार जणांनी अपवोट (लाईक) केलं आहे. तसेच, ४ हजारांहून अधिक लोकांनी कमेंट करून त्या सहकाऱ्याला पाठिंबा दर्शवला आहे.