समजा एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात मृत घोषित केले, त्या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी स्ट्रेचरवरुन घेऊन जात असताना अचानक तो व्यक्ती उठून उभा राहिला तर बाजूला असणाऱ्या लोकांची अवस्था काय होईल. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधील समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार शरीफ येथील रुग्णालयात पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहाचा दरवाजा सकाळपासून आतून बंद असल्याची माहिती सफाई कर्मचाऱ्याने दिली. त्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता दरवाजा आतून बंद होता.
तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले
पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडला असता आतमध्ये एक तरुण फरशीवर पडलेला आढळून आला. तेथे उपस्थित पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला त्याची नाडी न तपासता मृत घोषित केला. तरुणाला बाथरूममधून बाहेर काढण्यापूर्वी पोलिसही एफएसएल टीमची वाट पाहत होते. दरम्यान, कोणीतरी ही बाब सिव्हिल सर्जन डॉ. जितेंद्रकुमार सिंह यांना कळवली. सिव्हिल सर्जन यांनीही बाथरूममध्ये येऊन त्याला पाहिल्यावर नाडी न तपासता सफाई कामगाराला शवविच्छेदनासाठी नेण्याचे आदेश दिले.
पोस्टमार्टमसाठी घेऊन जाणार ही गोष्ट त्या तरुणाच्या कानावर पडताच तो तरुण लगेच स्ट्रेचरवरुन उभा राहिला. या तरुणाला उभे पाहून सिव्हिल सर्जनही चक्रावून गेले, तिथे उपस्थित असलेले लोकही घाबरले. त्या तरुणाला न तपासताच मृत घोषित केल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले.
हा तरुण अस्थावाच्या जिरैन गावचा राकेश कुमार आहे. हा तरुण रुग्णालयात औषधे घेण्यासाठी आला होता. मात्र, तो मद्यधुंद अवस्थेत होता. यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात दाखल केले. तरुण दारूच्या नशेत होता. यामुळे तो बेशुद्ध होऊन शौचालयात खाली पडला होता.