नवी दिल्ली : परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या बुद्धीची चाचणी घेणे. मात्र ही चाचणी घेणारी मंडळीच जर अशिक्षित असेल तर विद्यार्थी घडणार कसे हा मोठा प्रश्न आहे. सोशल मीडियावर नेहमी अशा भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. काही गोष्टी सर्वांचे मनोरंजन करतात तर काही गोष्टी खरोखरच विचार करण्यास भाग पाडतात. परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण असते. मात्र सध्या एका परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, जो सर्वांचे मनोरंजन करत असून त्यामुळे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. ही प्रश्नपत्रिका पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
दरम्यान, प्रश्नपत्रिकेत थोडासा वाकडा प्रश्न आला अथवा चुकीचा प्रश्न आला तर विद्यार्थी गोंधळून जातात. मात्र आता अशा चुका सहसा होत नाहीत, पण झाल्याच तर शिक्षकांना त्याची चांगलीच किंमत मोजावी लागते. अलीकडेच एका शाळेतील मुलांसोबत असेच काहीसे घडले आहे. जिथे शारीरिक शिक्षणाची परीक्षा घेण्यात आली आणि त्यामध्ये असा प्रश्न विचारला गेला की मुले बघतच राहिली.
शिक्षकांचा नमुना की निष्काळजीपणा? सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा पेपर आठवीचा असून प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नाची मोठी चर्चा रंगली आहे. यामध्ये कबड्डीबाबत (Kabaddi) प्रश्न विचारण्यात आला आहे. कबड्डीच्या एका संघात किती खेळाडू असतात? यामध्ये प्लेयरची स्पेलिंग देखील चुकीची लिहली असून पर्यायही चुकीचे देण्यात आले आहेत. पर्याय होते 10, 13, 12, आणि 14 आता हे पर्याय पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. खरं तर कबड्डीच्या एका संघात ७ खेळाडू असतात. मात्र या पर्यायांमध्ये कुठेच 7 या आकड्याचा पर्याय नव्हता. तसेच दोन्ही संघात मिळून एकूण 14 खेळाडू असतात मात्र हा जर योग्य पर्याय असेल तर प्रश्न विचारण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे कबड्डीच्या खेळात राखीव खेळाडू धरून एकूण 12 खेळाडू असतात मात्र या प्रश्नावरून नेटकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे 12 हा पर्याय जर योग्य असेल तर प्रश्नात चुक असल्याचे बोलले जात आहे.