नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमिशन शक्तीची घोषणा केल्यानंतर त्याची फार चर्चा झाली. भारतानं 27 मार्चला मिशन शक्तीअंतर्गत उपग्रहरोधक शस्त्र म्हणजेच A-SATच्या माध्यमातून सॅटेलाइटचा वेध घेऊन ते पाडलं होतं. अशा प्रकारे भारताला अवकाश संशोधन क्षेत्रात मोठं यश मिळालं होतं. मिसाइलच्या सहाय्यानं उपग्रह पाडणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरला. परंतु यासंदर्भात काही पोस्टही व्हायरल झाल्या आहेत.चीननं 2012मध्ये भारताचा हवामान उपग्रह पाडल्याच्या पोस्टही प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु याची पडताळणी केली असता, ते सर्व खोटं असल्याचं समोर आलं आहे. फेसबुकवर अमित शाह फॅन्स नावाचं पेज आहे. या पेजचे 612163 फॉलोअर्स आहेत. या पेजवर 1 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोटोबरोबर एक दावा केला होता. 2012मध्ये चीननं भारताचा एक हवामान उपग्रह पाडला होता आणि आता भारतानं मिशन शक्ती केल्यानंतर शांत राहण्याचं आवाहन करत आहे. मोदींमुळेच हे शक्य झालं, असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या असून, 130हून अधिक लोकांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली होती. 2012मध्ये चीननं एक उपग्रह पाडला होता, परंतु तो भारताचा नव्हता, असंही उघड झालं आहे.चीन 2007पासून उपग्रहरोधक क्षेपणास्त्राची चाचणी घेत होता. त्यासाठी त्यांनी स्वतःचा निष्क्रिय झालेला उपग्रह पाडला होता. त्या उपग्रहाचं नाव फेंग्युन 1सी होतं. त्यावेळी नासाच्या संशोधकांनी त्यावर चिंता व्यक्त केली होती. जर चीननं खरंच भारताचा उपग्रह पाडला होता, तर त्याची चर्चा का नाही झाली. या बातमीचा कोठेही उल्लेख नाही. असं काही झालं असतं तर भारत सरकारनं याचा विरोध नक्कीच केला असता. त्या वृत्ताची कुठेही खातरजमा होत नसून ती अफवा असल्याची चर्चा आहे. 2012मध्ये चीननं भारताचा कोणताही उपग्रह पाडलेला नव्हता.
व्हायरल सत्य! चीननं 2012मध्ये खरंच भारताचा हवामान उपग्रह पाडला होता?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 6:14 PM