नवी दिल्ली – हाथरस सामुहिक बलात्काराने संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेतील पीडित मुलीच्या मृतदेहावर मध्यरात्री उत्तर प्रदेश पोलिसांनी अंत्यसंस्कार केले, पीडित मुलीच्या घरच्यांनाही पोलिसांनी अंत्यसंस्कारापासून रोखलं, मुलीला शेवटचं बघूद्या अशी विनवणी पीडित मुलीचे आई-वडील करत होते, मात्र पोलिसांकडून जबरदस्तीने मुलीचा मृतदेह जाळण्यात आला. या प्रकारामुळे उत्तर प्रदेश पोलीस आणि योगी सरकारवर चहुबाजूने टीका होत आहे.
मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कृत्यामुळे लोकांमध्ये आणखी संताप व्यक्त करण्यात आला. यूपी सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करतंय? असा संतप्त सवाल विचारला जाऊ लागला. देशभरात यूपी पोलिसांवर असंवेदनशीलतेचा आरोप झाला. पीडित मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतानाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
योगी आदित्यनाथ यांच्यात या फोटोत ते पीडित मुलीच्या मृतदेहावर होत असलेले अंत्यसंस्कार लाईव्ह बघत असल्याचं दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियात शेअर करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बलात्कार झालेल्या पीडितेचे अंत्यसंस्कार मध्यरात्री कार्यालयात बसून लाईव्ह बघत होते असा दावा करण्यात आला आहे.
काय आहे या व्हायरल फोटोमागचं सत्य?
सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या फोटोबाबत ज्यावेळी आम्ही गुगलच्या माध्यमातून सर्च करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आमच्याहाती महत्त्वाची माहिती लागली. त्यानंतर रिवर्स इमेज सर्च सॉफ्टवेअर आणि उपलब्ध कि वर्डच्या मदतीनं हा फोटो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आहे. ज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हाथरस गँगरेपमधील पीडितेच्या वडिलांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत आहेत.
हाथरसच्या घटनेने देशभरातील लोकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी ज्यारितीने अंत्यसंस्कार केले त्यावर प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ३० सप्टेंबर रोजी पीडित मुलीच्या वडिलांशी संवाद साधला, त्यावेळी दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडितेच्या वडिलांना दिले. हा फोटो त्याचवेळचा आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकता की ज्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हाथरस पीडितेच्या कुटुंबाशी संवाद साधत होते, तो फोटो ब्लर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधल्यानंतर कुटुंबाने सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. आम्हाला न्याय मिळेल, आम्हाला आमच्या मुलीला शेवटचं बघता आलं नाही हे सत्य आहे, पण आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितले.
काय आहे फोटोचं सत्य?
यामुळे स्पष्ट होतंय की, हा फोटो सोशल मीडियात चुकीचा दावा करुन पोस्ट करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस गँगरेप पीडित मुलीचे अंत्यसंस्कार लाईव्ह पाहिले नाहीत. हा फोटो तेव्हाचा आहे ज्यावेळी ते गँगरेप झालेल्या मुलीच्या कुटुंबाशी संवाद साधत होते. त्याच फोटोला एडिट करुन हा दावा करण्यात येत आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पीडित मुलीच्या मृतदेहावरील अंत्यसंस्कार लाईव्ह बघत होते. हा दावा पूर्णत: चुकीचा आहे.
काय आहे प्रकरण?
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. पण दुर्देवाने मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला, यानंतर पोलिसांनी तिच्या आईवडिलांना दूर ठेवत तिच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले