नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या हाथरस बलात्कार घटनेने संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील पीडित मुलीने २९ सप्टेंबरला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात आरोपी संदीप, रामू, लवकुश आणि रवी नावाच्या ४ जणांना अटक केली आहे. हे चारही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
हाथरस घटनेतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देशभरातून होत आहे. यातच सोशल मीडियात भाजपाच्या बड्या नेत्यासोबत एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत असा दावा करण्यात आला आहे की, हाथरस घटनेतील आरोपीचे ते वडील आहेत, जे भाजपाच्या अनेक नेत्यांसोबत दिसतात. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत या व्यक्तीचा फोटो दिसत आहे.
हा फोटो सोशल मीडियात शेअर करताना दावा करण्यात आला आहे की, हाथरस बलात्कारातील आरोपी संदीपचे वडील जे योगी आणि मोदीसोबत आहेत, त्यामुळे हे चारही आरोपी वाचतील. सोशल मीडिया फॅक्ट चेकद्वारे माहिती मिळाली असता या फोटोसह केला जाणारा दावा खोटा आहे. ज्या व्यक्तीचा फोटो हाथरसमधील आरोपी संदीपचे वडील म्हणून सांगण्यात येत आहेत ते भाजपा नेते श्याम प्रकाश द्विवेदी आहेत. ते भाजपा युवा मोर्चाचे काशी विभागाचे उपाध्यक्ष आहे.
रिवर्स इमेज सर्च आणि काही किवर्डच्या मदतीने आढळलं की, डॉ. श्याम प्रकाश द्विवेदी यांच्या फेसबुक पेजवर हे सगळे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. आम्हाला या पेजवरील काही फोटो मिळाले, ज्यात द्विवेदी भाजपा नेत्यांसोबत आहेत. या पेजवरुन समजते की, द्विवेदी हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. गुगल सर्च केल्यावर श्याम प्रकाश द्विवेदी यांच्याबद्दल आणखी काही बातम्या मिळाल्या. १६ सप्टेंबर २०२० रोजी डीएनए, जी न्यूज सारख्या अनेक माध्यमात आलेल्या बातमीनुसार, द्विवेदी हे २०१९ मधील एका गँगरेपमधील आरोपी आहेत. १६ सप्टेंबरला प्रयागराज पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे.
काही बातम्यानुसार, समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रयागराजच्या सुभाष चौकात द्विवेदी यांच्याबद्दल वादग्रस्त फोटो लावला होता. या फोटोसह सपा कार्यकर्त्यांनी योगी सरकारच्या ऑपरेशन दुराचारी अभियानावर टीका केली होती. अलीकडेच यूपी सरकारने ऑपरेशन दुराचारी अंतर्गत महिला अत्याचारातील आरोपींचे फोटो शहरातील चौकाचौकात लावण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे फॅक्ट चेकनुसार या फोटोत दावा करण्यात आलेली व्यक्ती आरोपी संदीपचे वडील नसून भाजपा नेते श्याम प्रकाश द्विवेदी आहेत.
काय आहे प्रकरण?
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित मुलगी आपल्या आईसह शेतात गेली होती आणि अचानक गायब झाली होती. नंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत ती आढळून आली. आरोपीने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्नही केला होता. पीडित मुलीला दुसर्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने उत्तम वैद्यकीय सुविधांकरिता तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक आणि व्हेंटिलेटरवर होती. पण दुर्देवाने मंगळवारी तिने अखेरचा श्वास घेतला, यानंतर पोलिसांनी तिच्या आईवडिलांना दूर ठेवत तिच्या मृतदेहावर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले