मुंबई – राज्यात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे राज्यात सत्तांतर होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात सुरु आहेत. राज्यात भाजपा ऑपरेशन कमळ राबवत असून महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार अशी चर्चा सुरु आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावर सरकार पाडून दाखवा असं थेट आव्हानच विरोधकांना दिलं आहे.
अशातच राज्यात भाजपा सरकार आलं नाही म्हणून काही आमदार नाराज असल्याचा दावा केला जात आहे. यात ज्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. ते आमदार पुन्हा स्वगृही परतण्यासाठी उत्सुक आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार येईल अशी शक्यता असल्याने अनेक आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांचा समावेश होता.
सध्या सोशल मीडियात टीव्ही ९ या वृत्तवाहिनीचा हवाला देत भाजपाचे १२ आमदार फुटणार अशाप्रकारे फोटो आणि व्हिडीओ क्लीप व्हायरल होत आहेत. या बातमीत भाजपातील नाराज आमदारांचा गट महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामध्ये जे लोक राष्ट्रवादीसोडून गेले होते ते पुन्हा शरद पवार आणि अजित पवारांची भेट घेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीनेही प्लॅन बी तयार केला आहे, भाजपाचे हे आमदार राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवतील असा दावा करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता हा फोटो आणि व्हिडीओ टीव्ही ९ चा आहे हे सत्य असलं तरी ही बातमी डिसेंबर महिन्यातील आहे, ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपात यांच्यात बिनसलं, त्यामुळे शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला.
राज्यात सत्तांतर होत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्य महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे सत्तेच्या अपेक्षेने ज्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता त्यांची गोची झाली. त्यामुळे ते पुन्हा परततील अशी चर्चाही सत्तासंघर्षाच्या काळात होती. त्यामुळे ही बातमी ८ महिने जुनी आहे. त्याचा आत्ताच्या राजकीय परिस्थितीशी काहीही संबंध नाही. परंतु गेल्या काही दिवसात राजस्थानमध्ये सुरु असलेली राजकीय घडामोड पाहता राज्यातही अशाचप्रकारे हालचाली होतील अशी चर्चा सुरु आहे.