फतेहपूर - सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे सातत्याने व्हायरल होत असतात. अशातच उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील एका रिक्षाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. रिक्षामध्ये जास्त प्रवासी असल्याने पोलिसांनी चालकाला थांबवलं. त्यांनी सर्व प्रवाशांना रिक्षातून बाहेर येण्यास सांगितलं. रिक्षातून बाहेर येणाऱ्या प्रवाशांची मोजणी पोलिसांनी सुरू केली. तेव्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोजताना पोलीसही हैराण झाले. कारण रिक्षात चालकासह तीन, चार जण नव्हे तर तब्बल 27 जण असल्याची घटना आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूरमधील बिंदकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असलेली एक रिक्षा पोलिसांनी रोखली. चालक अतिशय वेगात रिक्षा चालवत असताना ललौली चौकात पोलिसांनी रिक्षा अडवली. यानंतर पोलिसांनी रिक्षात बसलेल्या लहानमोठ्यांना उतरण्यास सांगितलं. पोलिसांनी प्रवाशांची मोजणी केली असता रिक्षात चालकासह 27 जण होते. यानंतर पोलिसांनी रिक्षा जप्त केली.
पोलीस रिक्षातून प्रवाशांना उतरवून त्यांची मोजणी करत असताना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलवर त्याचा व्हिडीओ काढला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. रिक्षा चालकाने तब्बल 27 प्रवाशांना कसं काय बसवलं, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.