बंगळुरू - पित्याचे छत्र हा मुलांसाठी मोठा आधार असतो. त्यातही वडील आणि मुलगीचे नाते अगदी खास मानले जाते. बापलेकीच्या नात्यातील हे गहिरेपण अधोरेखित करणारा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. हा फोटो कर्नाटकमधील मलनाड परिसरातील सुलिया तालुक येथील आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती छत्री घेऊन ऊभी आहे. त्याखाली एक मुलगी ऑनलाइन क्लास अटेंड करताना दिसत आहे. पहिल्या नजरेत या मुलीच्या चिकाटीचे कौतुक वाटते. मात्र येथील मुलांसाठी शिक्षण किती कष्टप्रद आहे हे अधोरेखित होते. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. तर ऑनलाइन क्लास सुरू आहेत. त्यामुळे या ऑनलाइन क्लाससाठी इंटरनेट मिळवण्यासाठी मुलांना अनेक खटपटी कराव्या लागत आहेत. काही ठिकाणी मुले नेटवर्क असलेल्या ठिकाणी तंबू लावून बसत आहेत. तर काही ठिकाणी छत्रीखाली बसून मुले ऑनलाइन लेक्चर अटेंड करत आहेत.
हा फोटो महेस फुच्चापडी नावाच्या फोटोजर्नलिस्टने क्लिक केला आहे. त्यांनी सांगितले की, ही मुलगी दररोज संध्याकाळी चार वाजता एसएसएलसीच्या क्लाससाठी या ठिकाणी येते. सुलिया तालुलमधये राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ऑलनाइन शिक्षणादरम्यान, नेटवर्कसाठी उंच ठिकाणी जावे लागते. दरम्यान, या आठवड्यापासून इथे दक्षिण-पश्चिम मान्सून खूप सक्रिय झाला आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. खराब नेटवर्कमुळे मुलांना ऑनलाइन क्लाससाठी दुर्गम ठिकाणी जावे लागत आहे. काही विद्यार्थ्यांनी जिथे नेटवर्क मिळत आहे, अशा ठिकाणी टेंट लावले आहेत.
कोरोनाकाळात मुलांच्या शिक्षणासाठी ऑनलाइन क्लासचा पर्याय निवडण्यात आला आहे. मात्र ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांसाठी ऑनलाइन क्लासला हजर राहणे खूप कठीण जात आहे. कुठूनतरी स्मार्टफोनची व्यवस्था केली तरी खराब नेटवर्क त्यांच्यासाठी आव्हान ठरत आहे. केवळ विद्यार्थीच नाही तर वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करणाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.