एकमेकांशी भांडायचं नाही, मारामाऱ्या करायच्या नाहीत, सगळ्यांशी मित्रासारखं वागायचं, शिव्या दिल्या तर कडक शिक्षा करू, अशा सूचना करून शिक्षक विद्यार्थ्यांना घडवत असतात. पण, बिहारची राजधानी पाटणामधील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिका आणि शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांसमोरच 'राडा' झाला. त्या एकमेकींना शिव्या देत थपडा, लाथा मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हाणामारीचं कारण वाचून तुम्हीही नक्कीच डोक्यावर हात मारून घ्याल. शाळेची खिडकी लावण्यावरून दोन शिक्षकांमध्ये वाद सुरू झाला.
हे प्रकरण बिहारमधील बिहटा प्रखंड येथील सरकारी शाळेचा आहे. आपापसातील वादावरून शाळेच्या मुख्याध्यापिका कांती कुमारी आणि शिक्षिका अनिता कुमारी यांच्या तुंबळ हाणामारी झाली. हा वाद इतका वाढला होता की दोघांनी एकमेकांना लाथा, बुक्के, चपलेनंही मारलं.
यानंतर काही लोकांनी मध्यस्थी करत त्यांना सोडवलं. यादरम्यान, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांपैकी कोणी त्या घटनेचा व्हिडीओ काढला आणि तो व्हायरल केला. दरम्यान प्रखंड शिक्षण पदाधिकारी नवेष कुमार यांनी दोन्ही शिक्षिकांमध्ये काही वैयक्तिक वाद होता असं म्हटलं. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी त्यांच्या सूचनांनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.