नवी दिल्ली - लग्न म्हटलं की डीजे आलाच. पण अनेकदा त्यावर लावली जाणारी गाणी आणि आवाज यावरून वाद होतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. डीजेवरून वाद पेटला आणि भर मंडपात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये ऐन लग्नाच्या वेळी गोंधळ निर्माण झाला. डीजेवर नाचणारे पाहुणे हे आपापसातच भिडल्याचं पाहायला मिळालं. तसेच लग्नात डीजेवरून झालेल्या वादानंतर वर आणि वधू पक्षाच्या पाहुण्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे.
लग्न मंडपात हाणामारी सुरू असल्याची माहिती काहीजणांनी पोलिसांना फोनवरून कळवली. ही माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. वऱ्हाडी मंडळींना त्यांनी एकमेकांपासून वेगळं केलं आणि त्यांच्यातील भांडणं शांत केलं. दोन्हीकडील मंडळींना समजवण्याचा प्रयत्न केला. डीजेवर नाचण्याच्या किरकोळ मुद्द्यावरून सुरू झालेल्या या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मंडपातील खुर्च्या एकमेकांवर फेकल्या
मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूरच्या एका गावामधील एका मुलीचं लग्न ठरलं होतं. त्यासाठी बिलंदा या गावातून वरात आली होती. दुपारी लग्नात जेवण होण्यापूर्वी डिजे लावण्यात आला होता. गाण्यावर ठेका धरण्यासाठी वऱ्हाडी मंडळींमध्ये चढाओढ लागली होती. मात्र अचानक असं काही तरी घडलं ज्यामुळे डान्स करणारी पाहुणे मंडळी भांडू लागले आणि एकमेकांवर तुटून पडली. मिळेल त्या वस्तू फेकून मारू लागली. मंडपातील खुर्च्या देखील त्यांनी एकमेकांवर फेकल्या.
काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर भागात लग्न सुरू असताना जोरदार गोंधळ झाला होता. ज्या व्यक्तीचं लग्न होतं, त्याची पहिली पत्नी अचानक घटनास्थळी दाखल झाली आणि मोठा वाद सुरू झाला. यावेळी पहिल्या पत्नीसोबत आलेले तिचे नातेवाईक आणि दुसऱ्या पत्नीचे नातेवाईक यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. बराच काळ त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.