आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडणे एका श्वानाला महागात पडले. त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विजयवाडामधील घराच्या भिंतीवर लावलेले मुख्यमंत्र्यांचे पोस्टर श्वानाने फाडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
“सातत्याने सावरकरांचा अपमान, राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करु”: रणजित सावरकरांचा इशारा
तेलुगु देसम पार्टीचे कार्यकर्ता असल्याचं सांगत दासरी उदयश्री यांनी उपहासात्मक पद्धतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या श्वानावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्यासह अन्य काही महिलांनी केली आहे.
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याबद्दल मला खूप आदर असल्याचे त्यांनी स्थानिक वृत्तवाहिन्यांना सांगितले. अशा नेत्याचा अपमान करणाऱ्या श्वानाने राज्यातील सहा कोटी जनतेला दुखावल्याचे ते म्हणाले. आमच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या श्वानाला अटक करण्याची आम्ही पोलिसांना विनंती केली आहे, असेही ते पुढे म्हणाले.
यापूर्वी जगन मोहन रेड्डी यांच्या फोटोसह श्वानाने स्टिकर फाडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाने घरावर जगन्नाथ मां भविष्यथु नारा असलेले स्टिकर चिकटवले होते. टीडीपीच्या अनेक समर्थकांनी त्यांच्या सोशल अकाउंटवरून व्हिडीओ अपलोड केला आहे.