इराकमध्ये लग्नानंतर नवरा-नवरी लग्नमंडपात डान्स करत होते. याच दरम्यान, लग्नमंडपात अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. हॉलमधील कापड आणि सजावटीचे साहित्य जळून खाली पडू लागलं. लग्नमंडपात फुलांऐवजी लोकांच्या अंगावर आगीचे गोळे पडले. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली. या घटनेत 100 हून अधिक लोकांचा होरपळून मृत्यू झाला, तर 150 लोक जखमी झाले आहेत.
लग्नमंडपात लागलेल्या आगीचा व्हि़डीओ आता समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. थरकाप उडवणारा हा व्हिडीओ इराकमधील काराकोश गावाजवळचा आहे. व्हिडीओमध्ये नवरा-नवरी आनंदाने डान्स करताना दिसत आहेत. तसेच लग्नासाठी उपस्थित असलेले पाहुणे देखील या सर्व गोष्टी आनंदाने पाहत आहेत. याच दरम्यान अचानक मंडपात आग लागते.
आग लागल्यानंतर मंडपात एकच गोंधळ उडाला. लोक सैरावरा पळू लागले, हळूहळू लग्नमंडपातून बाहेर पडू लागले, मात्र काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केलं. घटनेनंतरच्या फुटेजमध्ये इमारतीचं आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
इराकी वृत्तसंस्थेने नागरी संरक्षण अधिकार्यांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, लग्न मंडपाच्या बाहेरील भाग अत्यंत ज्वलनशील आवरणाने सजवला गेला होता, ज्यावर इराकमध्ये बंदी आहे. सिव्हिल डिफेन्सने सांगितले की, ही आग अत्यंत ज्वलनशील, कमी किमतीच्या बांधकाम साहित्याच्या वापरामुळे लागली, ज्यामुळे लग्नमंडपाचा काही भाग कोसळला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.