काही दिवसांपूर्वी फायर पानचा एक व्हिडिओ चर्चेत आला होता. त्यानंतर फायर पाणीपुरीच्या एका व्हिडिओनं देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ आता इन्स्टाग्रामवरील फायर मोमोजच्या एका व्हिडिओनं नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. paidaishi_foodie (पैदाईशी फुडी) नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून ९३ हजारपेक्षा जास्त लोकांनी तो लाईक केला आहे. व्हायरल होत असलेला फायर मोमोजचा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील जयपुरिया मार्केटमधील असल्याचं सांगितलं जात आहे. जयपुरिया मार्केटमधील एका स्टॉलवर फायर मोमोज तयार करून लोकांना खाऊ घातले जात असल्याचं दिसत आहे.
मोमोज हा खाद्यपदार्थ अनेकांना आवडतो. त्याचे प्रामुख्यानं दोन प्रकार पडतात. व्हेज मोमोज आणि नॉन-व्हेज मोमोज. तेलामध्ये तळून किंवा वाफेवर उकडून हे मोमोज तयार केले जातात. मात्र, त्यामध्ये आता वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी बाहुबली गोल्ड मोमोज तयार करण्यात आले होते. आता त्याही पलीकडे जाऊन गाझियाबादमध्ये फायर मोमोज तयार केले जात आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्टॉलवरील व्यक्ती उकडलेले मोमोज पुन्हा तेलामध्ये तळून काढताना दिसत आहे. त्यानंतर त्यात चिरलेल्या भाज्या आणि विविध प्रकारचे सॉसेस टाकून ते परतवून घेत आहे. यादरम्यान, त्या फ्राईंग पॅनमध्ये आगीचा भडका उडताना दिसतो. हो हो अगदी बरोब्बर हॉटेलमध्ये सिझलर्स खाताना किंवा फायर पानच्या व्हिडिओत होता तसाच भडका क्षणभर दिसतो. त्यामुळे मोमो जळत नाहीत. त्यानंतर हे फायर मोमोज ग्राहकांना सर्व्ह केले जात, असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
इन्स्टाग्रामवरील या फायर मोमोजच्या व्हिडिओला लोकांची पसंती मिळत आहे. अनेकांनी त्यावर गमतीशीर कमेंट देखील केल्या आहेत. एकानं कमेंट केली आहे 'फायर तो कल सुबह निकलेगा' तर एकानं म्हटलं आहे 'इससे स्टमक कॅन्सर होजायेगा' एकूणचं युजर्स फायर मोमोजच्या व्हिडिओचा आनंद घेत आहेत.