(प्रातिनिधीक छायाचित्र)
पिवळ्या रंगाचे अंगावर काळे ठिपके असलेले बिबटे तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण काळ्या रंगाचा बिबट्या म्हणजेच ब्लॅक पॅंथर तुम्ही प्रत्यक्षात पाहिला नसेल. हा ब्लॅक पॅंथर तुम्ही जंगल बूकमध्ये नक्कीच पाहिला असेल. पण हे दुर्मीळ असलेले ब्लॅक पॅंथर क्वचितच आढळून येतात. पण असाच एक खराखुरा ब्लॅक पॅंथर गोव्यात आढळून आला आहे.
गोव्यात पहिल्यांदाच हा दुर्मीळ ब्लॅक पॅंथर कॅमेरात कैद झाला असून त्याचे फोटो पाहून लोक अवाक् झाले आहेत. साऊथ गोव्यात हा ब्लॅक पॅंथर आढळून आला आहे. Netravali wildlife sanctuary मधे तो आढळून आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर ब्लॅक पॅंथरचा सुंदर फोटो शेअर केलाय.
आता वन अधिकारी असे आणखी ब्लॅक पॅंथर इथे आहेत याचा शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच एक ब्लॅक पॅंथर नेत्रावली अभयारण्यात कॅमेरात कैद झाला आहे.
सोशल मीडियातील लोकही ब्लॅक पॅंथरचा हा सुंदर फोटो पाहून थक्क झाले आहेत. अनेकजण त्याला बगीरा म्हणत आहेत. तर अनेकांनी वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काळा बिबट्या वेगळा कसा?
काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात.
काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त असतात. तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाममध्ये व नेपाळमध्ये आढळतात. आफ्रिकेमधे ते माउंट केनियाच्या जंगलांमध्ये आहेत.