आकाशातून पडणारा पाऊस, बर्फवृष्टी तुम्ही पाहिली असेल. पण तुम्ही कधी माशांचा पाऊस पाहिला आहे का? सोसाट्याचा वारा सुटलाय आणि त्यासोबत मासे जमिनीवर पडताहेत, असं दृष्य तुम्ही कधी पाहिलंय का? उत्तर प्रदेशच्या भदोहीमध्ये काल असा प्रकार घडला. जोरदार वारा सुटला. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासोबत मासे उडून आले. त्यानंतर जमिनीवर माशांचा पाऊस पडू लागला. हा प्रकार पाहून ग्रामस्थ धास्तावले. काही अनुचित घडत असल्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली.
आकाशातून माशांचा पाऊस सुरू झाल्यानं परिसरात खळबळ माजली. ही घटना सामान्य नसल्याचं हवामानतज्ज्ञांनी सांगितलं. वादळी वारे सुटल्यावर आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यावर अशा घटना घडतात, असं काही स्थानिकांचं म्हणणं आहे. भदोहीमधील कंधिया फाटकाजवळ असलेल्या यादव वस्तीच्या शेजारच्या भागात सोमवारी पावसासोबत मासेही जमिनीवर पडले. हे दृश्य पाहणारे हैराण झाले.
माशांचा पाऊस पडत असल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. काहींच्या छतांवर मासे पडले. काहींच्या अंगणात माशांचा पाऊस पडला. त्यामुळे ग्रामस्थांची एकच धावाधाव झाली. परिसरात पडलेल्या माशांचं एकूण वजन ५० किलो भरलं. हे मासे विषारी असतील अशी भीती अनेकांना वाटली. त्यामुळे काहीतरी विपरित घडेल या भीतीनं ग्रामस्थांनी ते तलाव आणि खड्ड्यांमध्ये फेकले.